पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची ऑफर देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात मध्य प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका व्यक्तीला रॅली दरम्यान पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्यासाठी एक फोन आला होता. यासाठी संबंधित व्यक्तीला ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

मध्य प्रदेशातील कुशल सोनी यांनी त्यांना पाकिस्तानमधील एका फोन नंबरवरुन कॉल आल्या दावा केला. +७९६५१२१९ या नंबरवरुन कुशल सोनी यांना पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. ‘मुंबईतील रॅली दरम्यान पंतप्रधान मोदी यांना मारण्याच्या कटात सहभागी होण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर फोनवरुन देण्यात आली. मोदींना ठार मारण्यासाठी दोघांची निवड केली असून तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता आहे, असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. या कामासाठी हवे तितके पैसे द्यायला तयार आहोत, असेदेखील समोरील व्यक्ती म्हणाली,’ अशी माहिती कुशल सोनी यांनी सतना पोलिसांना दिली. पंतप्रधान मोदी २५ मे रोजी मुंबईत येणार आहेत.

कुशल सोनी यांनी सुरुवातीला हा कॉल फारसा गांभीर्याने घेतला नाही. मात्र यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाची संवेदनशीलता ओळखून याबद्दलची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर सतना पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. ‘आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. आलेला फोन कॉल चेष्टा मस्करी म्हणून केला होता की खरेच यात खरेच काही तथ्य आहे, हे तपासानंतरच समोर येईल,’ असे पोलीस अधीक्षक मिथिलेश कुमार यांनी म्हटले.

पोलिसांना तपासणीदरम्यान संबंधित फोन कॉल कझाकस्तानमधून आल्याची माहिती मिळाली. सोनी यांनी कॉलचे रेकॉर्डिंगदेखील पोलिसांना पुरवले आहे. ‘या घटनेचा तपास सुरु आहे. तपासानंतरच याबद्दल स्पष्टपणे बोलता येईल,’ असे मिथिलेश कुमार यांनी पुढे बोलताना म्हटले.

काही दिवसांपूर्वी सतनामधील एका व्यक्तीला विधानसभेत आणि भोपाळ रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याबद्दलचा कॉल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीसाठी करण्यात आलेल्या फोन कॉलचा पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरु केला आहे.