शिवसेनेने आता राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सुचवले आहे. शरद पवार राष्ट्रपती पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. भाजपने शरद पवारांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी द्यावी, असेदेखील राऊत यांनी म्हटले. देशाचे पुढील राष्ट्रपती होण्याची क्षमता शरद पवारांमध्ये असून ते राष्ट्रपती पदासाठी योग्य आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. एनडीटीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे. प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे.

शरद पवारांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली गेल्यास त्यांना काँग्रेस, डावे, नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल यांचादेखील पाठिंबा मिळू शकतो. काँग्रेससह डावे पक्ष आणि संयुक्त जनता दल हे पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला विरोध करण्याची दाट शक्यता आहे. मात्र शरद पवारांना भाजपने रिंगणात उतरवल्यास विरोधी पक्षांकडून त्यांना पाठिंबा मिळू शकतो.

‘शरद पवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील पवारांच्या नावाला पाठिंबा देतील. मात्र राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेची पहिली पसंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच असेल,’ असेदेखील संजय राऊत यांनी म्हटले. मात्र मोहन भागवत यांनी आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

शिवसेना आणि भाजपचे संबंध गेल्या अनेक महिन्यांपासून ताणलेले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. शिवसेनेने मागील दोन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन दिले होते.

शिवसेनेने शरद पवारांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवलेले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शरद पवार यांचे पंतप्रधान मोदींसोबत असलेले सलोख्याचे संबंध आणि त्यांना देण्यात आलेला पद्मविभूषण पुसस्कार यामुळे राष्ट्रपती पदाची उमेदवारी शरद पवारांना दिली जाणार अशी चर्चा जोरात सुरु होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत शरद पवार राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले होते.