बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी आपले कट्टर प्रतिस्पर्धी लालूप्रसाद यादव यांच्यासह काँग्रेस आणि भाकपकडे मदतीची याचना केली आहे. राज्य सरकार अस्थिर करण्याची भाजपची योजना उधळून लावण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती नितीशकुमार यांनी केली आहे.
राज्यसभेच्या दोन जागांसाठी बिहारमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत जद(यू)च्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान समोर ठाकल्याने नितीशकुमार आता लालूप्रसाद यांच्याकडे वळले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी, विधिमंडळ पक्षनेते सदानंदसिंग आणि भाकपचे सचिव राजेंद्र सिंग यांच्याशी आपण चर्चा केली आहे. जद(यू)च्या दोन उमेदवारांना विजयी करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली आहे, असे नितीशकुमार म्हणाले.
जद(यू)ने या पोटनिवडणुकीसाठी पवन वर्मा आणि गुलाम रसूल बालियावी यांना उमेदवारी दिली असून त्यांच्यापुढे बिल्डर अनिल शर्मा आणि साबीर अली या अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. पक्षातील बंडखोर आणि भाजपने या अपक्षांना पाठिंबा दिला आहे. येत्या १९ जून रोजी ही निवडणूक होणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे सरकार अस्थिर करून राज्यात मुदतपूर्व निवडणुका घेण्याची योजना भाजपने आखली आहे त्यामुळे ही योजना उधळून लावण्यासाठी आपण तीन धर्मनिरपेक्ष पक्षांना आवाहन केले आहे, असे नितीशकुमार म्हणाले.
जद(यू)च्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपण कट्टर प्रतिस्पर्धी लालूप्रसाद यांच्याशी संपर्क साधणे राजकीयदृष्टय़ा सक्तीचे होते का, असे विचारले असता नितीशकुमार म्हणाले की, सक्ती नव्हे तर राजकीय परिस्थितीमुळे आपण यादव यांच्याशी संपर्क साधला आहे.

‘सरकार अस्थिर करण्यात भाजपला स्वारस्य नाही’
मुझफ्फरपूर (बिहार) : बिहारमधील जद(यू)चे सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करीत असल्याचा माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेला आरोप भाजपने फेटाळून लावला आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी नितीशकुमार राजदचे नेते लालूप्रसाद यांच्याकडे भीक मागत आहेत, असा हल्ला भाजपने चढविला आहे. बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या सरकारचा रिमोट कंट्रोल नितीशकुमार यांच्या हातात असून ते सरकार अस्थिर करण्यात भाजपला स्वारस्य नाही, असे भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे. नितीशकुमार यांनीच स्वगृही आग लावली असून आता ते आम्हाला दूषणे देत आहेत, असेही मोदी म्हणाले.

‘नितीशकुमार-लालूप्रसाद
बळजबरीने एकत्र’
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव या कट्टर प्रतिस्पध्र्याना बळजबरीने एकत्र येणे भाग पडले आहे. मात्र जनतेने या दोघांनाही नाकारले असल्याने या मीलनाचा त्यांना लाभ होणार नाही, असे लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे. जे प्रतिस्पर्धी एकमेकांवर खापर फोडण्याची एकही संधी सोडत नव्हते तेच आता एकमेकांकडे पाठिंब्याची याचना करीत आहेत, असेही पासवान म्हणाले.