बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून एनडीएने शिक्कामोर्तब केले आहे. खरेतर रामनाथ कोविंद यांचे नाव आजवरच्या चर्चेत कुठेच नव्हते. रामनाथ कोविंद यांचे नाव निश्चित करत भाजपने काहीसा धक्कातंत्राचा वापर केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नेमके त्यांचेच नाव चर्चेत कसे आले, याबाबत ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. रामनाथ कोविंद हे राजकारणातले अनुभवी नेते आहेत, समाजातल्या दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कायमच काम केले आहे. सामाजिक क्षेत्रात दुर्बल घटकांचा विकास कसा होईल याच्यावर त्यांनी कायम भर दिला आहे. तसेच भारतीय राजकारणातले सूज्ञ आणि सुजाण नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या याच गुणांचा विचार भाजपने केला आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, अशी प्रतिक्रिया सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे.

लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आणि इतर अनेक  नावांची चर्चा फक्त मीडियात होती. भाजपच्या कोअर कमिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर काही नावांचा प्रस्ताव ठेवला होता. ती यादी कोणती होती ही माहिती गोपनीय ठेवण्यात येते. मात्र या यादीतून रामनाथ कोविंद यांचे नाव निवडले गेले, अशी माहितीही सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे.

रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केली. रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून सर्वश्रुत आहेत. तसेच त्यांचे समाजसेवेतले योगदान खूप मोठे आहे. त्याचमुळे राष्ट्रपतीपदासाठी ते योग्य उमेदवार असल्याचे आणि त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे शाह यांनी स्पष्ट केले आहे.

रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार आहेत, ही माहिती आम्ही आमच्या सगळ्या घटक पक्षांना कळवली आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही दूरध्वनीद्वारे ही माहिती दिली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही दूरध्वनीद्वारे हे नाव सांगण्यात आले आहे, अशी माहितीही अमित शाह यांनी पत्रकारांना दिली. राष्ट्रपतीपद निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी आत्तपर्यंत १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती समोर येते आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख २८ जून आहे. तर १ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १७ जुलै रोजी गरज पडल्यास राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. २० जुलैरोजी राष्ट्रपतींची घोषणा होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती २५ जुलैला आपला पदभार स्वीकारतील.