भारतीय ग्राहकांचा मोबाइल डेटा लीकप्रकरणी केंद्र सरकार ‘यूसी (UC) ब्राऊजर’ची चौकशी करत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, या प्रकरणी दोषी आढळल्याचे समोर आल्यास यूसी बाऊजरवर भारतात बंदी घातली जाऊ शकते. ‘यूसी ब्राऊजर’ चीनची आघाडीची कंपनी ‘अलीबाबा’चे बाऊजर आहे. याचा उपयोग इंटरनेट वापरासाठी केला जातो. या ब्राऊजरवर भारतीय ग्राहकांशी निगडीत माहिती लीक करण्याचा आरोप आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना हा अधिकारी म्हणाला, भारतीय ग्राहकांचा मोबाइल डेटा आपल्या चीनमधील सर्व्हरला पाठवतो, असा यूसी ब्राऊजर विरोधात आरोप आहे. मोबाइलवरून हे ब्राऊजर ‘अनइन्स्टॉल’ केल्यानंतर ब्राऊजिंग डेटाही नष्ट होतो. तरीही त्या मोबाइलच्या डीएनएसवर त्यांचे नियंत्रण असते, अशाही तक्रारी येत आहेत. जर हे आरोप सिद्ध झाले तर या ब्राऊजरवर देशात बंदी घातली जाऊ शकते. यूसी ब्राऊजरचे नियंत्रण करणाऱ्या कंपनीला या तक्रारीबाबत मेल केल्यानंतरही कोणतेच उत्तर मिळाले नाही. यूसी ब्राऊजर अलीबाबाच्या मोबाइल उद्योग समूहाचा एक भाग आहे.

अलीबाबा समूहाने भारतात पेटीएम व याच समूहाची प्रमूख कंपनी ‘वन ९७’ मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर त्यांनी स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक केली आहे. भारत व इंडोनेशियात १० कोटींहून अधिक लोक सक्रीय ग्राहक असल्याचा दावा यूसी ब्राऊजरने गेल्या वर्षी केला होता. एका अहवालानुसार भारतात गुगल क्रोमनंतर यूसी ब्राऊजरचा सर्वाधिक वापर केला जातो.