लोकसभा निवडणुकीनंतर सतत पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेस पक्षाला दक्षिण भारतातून दुसरा मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेत्या जयंती नटराजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच शरसंधान केले. पर्यावरणमंत्री असताना आपल्या निर्णयात राहुल गांधी हस्तक्षेप करीत असल्याचा बॉम्बगोळ नटराजन यांनी टाकला. भाषणात पर्यावरण धोरण ठरवताना आदिवासींच्या हिताचा विचार करणाऱ्या राहुल गांधी यांनी नंतर उद्योगजगतासाठी पूरक धोरण आणल्याचा गंभीर आरोप नटराजन यांनी केला आहे. तामिळनाडूमधून जी. के. वासन यांच्यापाठोपाठ नटराजन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षात राहुलविरोधी सूर तीव्र झाला आहे. मात्र, दिग्विजय सिंह, अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र राहुल यांची पाठराखण करीत नटराजन यांच्यावर शसरंधान केले आहे.
संपुआ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पर्यावरणमंत्री असलेल्या जयंती नटराजन यांनी पदावर असताना राहुल गांधी यांना पत्र लिहिले होते. ज्यात ‘तुमची(राहुल) सूचना माझ्यासाठी आदेश आहे,’ असे लिहिले आहे. या पत्राचा संदर्भ देत आपण गांधी परिवाराच्या विरोधात नसल्याचे स्पष्टीकरण नटराजन यांनी देण्याचा प्रयत्न केला. परंतु मागूनही ‘हायकमांड’ने भेटण्याची वेळ  दिली नाही, असे सांगून नटराजन यांनी काँग्रेसमध्ये फोफावलेल्या संस्कृतीचे धिंडवडे काढले.
मंत्रिपदावरून दूर करून राहुल गांधी यांच्या कार्यालयाने व काही बडय़ा काँग्रेस नेत्यांनी माझी बदनामी सुरू केली. त्या प्रकाराचा त्रास झाला. या मुद्दय़ावर वारंवार वेळ मागूनही राहुल वा सोनिया गांधी भेटल्या नाहीत. राहुल यांच्या सूचनेवरून वेदांता समूहाशी संबंधित एका प्रकल्पास मंजुरी दिली नव्हती, असा खुलासा नटराजन यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र अदानी समूहाच्या प्रकल्पाशी संबंधित फाईल आपल्यापासून दडवून ठेवण्यात आली. मी पदावरून दूर झाल्यानंतर मंत्रालयाच्या स्वच्छतागृहात ही फाईल सापडली व मंत्र्यांनी या प्रकल्पास मंजुरी दिली. हा प्रकार राहुल गांधी यांच्या निटकवर्तीयांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केला असल्याचा आरोप नटराजन यांनी केला.
मोठमोठय़ा प्रकल्पांना मंजुरी देताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली होती. त्याचे प्रामाणिकपणे पालन करूनही मंत्रिमंडळातून सक्तीने गच्छंती करण्यात आली.
राहुल यांच्याविरोधात यल्गार करणाऱ्या नटराजन यांनी अन्य पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले. पर्यावरणमंत्री असताना घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची चौकशी करण्याची मागणी नटराजन यांनी केली. त्यास केंर्दीय अर्थमंत्री अरुण जेटली व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अनुकूलता दर्शवली आहे.

नटराजन संधिसाधू-काँग्रेसचे प्रत्युत्तर
 नटराजन यांच्या आरोपांनंतर पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बचावासाठी केंद्रीय नेते मैदानात उतरले आहेत. उद्योग जगताचे भले करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपल्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रिपदावरून दूर केल्याचा गौप्यस्फोट करीत नटराजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राहुल यांचा बचाव करताना पक्ष प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, नटराजन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. त्यात कितपत तथ्य होते हा एक वेगळा विषय आहे. पण आरोप झाल्यानेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर असा कोणता दबाव आला की नटराजन यांनी आत्ताच तोंड उघडले? नटराजन एकदाही लोकसभा निवडणूक लढल्या नाहीत. तरी त्यांना काँग्रेसने सलग चारदा राज्यसभा सदस्यत्व देऊन केंद्रात मंत्री केले. त्यांच्यावर ‘जयंती टॅक्स’ वसूल करतात अशी टीका झाली. त्याचे उत्तर त्यांनी एकदाही दिले नाही असा आरोप केला.

सोनियांना पाठविण्यात आलेल्या पत्रातील मुद्दे
यूपीए-२ राजवटीत मंत्रिपदाचा राजीनाम्याबाबत आपल्याला २० डिसेंबर २०१३ रोजी राजीनामा देण्यास सांगण्यात आल्यापासून आजमितीपर्यंत राजीनामा देण्यास का सांगितले त्याचे कारणच तुम्ही दिलेले नाही अथवा स्पष्टीकरण देण्याची संधीही देण्यात आली नाही. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या कामाची स्तुती केली होती, असे असताना आपल्याला अशी वागणूक का देण्यात आली?
राहुल यांच्याकडून करण्यात आलेल्या विनंत्यांबाबत.
राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यालयाकडून पर्यावरणविषयक काही विनंत्या करण्यात आल्या आणि त्याचा आपण आदेश म्हणून आदर केला. ओदिशात जाऊन राहुल गांधी यांनी डोंगरिया कोंढ जमातीला आपण त्यांचे शिपाई असल्याचे सांगितले.  त्यामुळे वेदांतकडून होणारी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक थांबविल्याची टीकाही आपल्यावर झाली.