म्यानमार येथून हद्दपार करण्यात आलेले रोहिंग्या नागरिक सध्या बांगलादेशमधील निर्वासितांच्या छावण्यामध्ये राहत आहेत. या छावण्यांमध्ये मुस्लिमांबरोबरच काही हिंदू निर्वासितही आहेत. या छावण्यांमध्ये आपला छळ केला जात असल्याचा आरोप काही हिंदू रोहिंग्या महिलांनी केला आहे. येथे आम्हाला कपाळावरील कुंकू जबरदस्तीने काढायला तसेच हातातील बांगड्या फोडण्यास सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर नमाज पठण करण्यासही सांगण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिले आहे.

बांगलादेशातील या छावण्यांमध्ये हिंदू महिलांना मुस्लिम रोहिंग्यांकडून सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. म्यानमारमधून बाहेर पडलेल्या या नागरिकांमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या लोकांचा समावेश आहे. मात्र, यात मुस्लिमांची संख्या जास्त असल्याने हिंदूंवर अन्याय होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिस्थितीबाबत रबिया नावाच्या महिलेने आपली कर्मकहानी सांगितली आहे. ती हिंदू महिला असून आता तिचे पूजा हे नावही बदलले आहे. या महिन्यांतच हा प्रकार सुरु झाल्याचे तिने सांगितले.

पुजा ऊर्फ रबिया या महिलेच्या पतीचा गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्यू झाला आहे. तिने सांगितले की, तिच्या पतीचा लष्कराच्या गोळीबारात मृत्यू झालेला नाही. काळे कपडे घालून चेहरा झाकून आलेल्या लोकांनी त्याचा जीव घेतला आहे. हे लोक धर्माच्या नावाने गोंधळ घालत होते. या महिलेच्या संपूर्ण कुटुंबाला तिच्या समोरच गोळ्या घालून मारण्यात आले. मात्र केवळ ती स्वत: यातून बचावली आहे.

ज्या लोकांनी तिच्या कुटुंबीयांना मारले, ते लोक त्यांना सुरुवातीला एका जंगलात घेऊन गेले. त्यानंतर तेथे त्यांनी जबरदस्तीने नमाज पठण करायला लावले. त्यानंतरच तुला सोडण्यात येईल अशी धमकी त्यांनी दिल्याचे या महिलेने सांगितले. यावेळी माझ्या कपाळावरील कुंकू पुसण्यात आले. तसेच धार्मिक परंपरेचे प्रतिक असलेल्या बांगड्याही फोडण्यात आल्या. तसेच मी माझा धर्म बदलला तरच मला जिवंत सोडण्यात येईल, असे धमकावण्यात आल्याचे तिने सांगितले.

[jwplayer DBcZ40FF]