उभय देशांमधील ‘कायदेशीर हित’ समोर ठेवूनच मॉरिशसबरोबरच्या परस्पर करविषयक करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील, असे भारताच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. देशाच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज शनिवारपासून मॉरिशसच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. सुषमा स्वराज यांची ३ नोव्हेंबर रोजी मालदीवच्या परराष्ट्रमंत्री दुनिया मामून यांच्याशी बैठक होणार आहे. मॉरिशसहून परतताना त्या अरविन बूलेल यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील करविषयक करारात नव्याने बदल करण्यात येणार आहे. यासाठी दुहेरी कराचा अडथळा दूर करण्याविषयी सकारात्मक बोलणी केली जातील. यासाठी दोन्ही देशांचे ‘कायदेशीर हित’ प्राधान्याने सुरक्षित करण्यावर भर देण्यात येईल. त्यानंतर हा करार अस्तित्वात येईल, असे परराष्ट्र व्यवहार सचिव सईद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पोलीस ठाणी ‘न्यायमंदिरे’होण्याची गरज – राजनाथ
हैदराबाद : पोलीस ठाणी ही न्यायमंदिरे होण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले असून जनतेची सेवा करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहनही केले आहे. पोलीस ठाणे हे न्यायमंदिर व्हावे असे आपल्याला वाटते, मात्र अन्यायाने पीडित, निराधार व्यक्ती न कचरता पोलीस ठाण्यात आली पाहिजे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची व्यथा ऐकून ती सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे तरच न्यायमंदिरांची संकल्पना कृतीत येईल, असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या एका तुकडीला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री पुढे म्हणाले की, कर्तव्य बजावताना पोलीस अधिकाऱ्याने संकुचित मनोवृत्ती ठेवू नये, तरच तुमची पत वाढेल. सर्वसामान्य जनतेचे रक्षण करण्याची पोलिसांची आता जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
भारत-पाक सीमेवरील १२५ मतदान केंद्रे हलविणार
जम्मू : सीमेवर राहणाऱ्या मतदारांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने १२५ मतदान केंद्रे सुरक्षित स्थळी हलविण्याचे ठरविले आहे. मतदानाच्या वेळी सीमेपलीकडून हल्ले होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जम्मू जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील १२५ मतदान केंद्रे सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी अजितकुमार साहू यांनी सांगितले. सीमेपीलकडून १५० मतदान केंद्रांवर हल्ले होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात सीमेपलीकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात जवळपास १० जण ठार झाले तर ९० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या ३२ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सीमेवरील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली असून शांततेचे आणि पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही साहू म्हणाले.
बगदादमध्ये साखळी स्फोटांत १५ ठार
बगदाद : बगदादनजीक बाजारपेठेत झालेल्या मालिका बॉम्बस्फोटात किमान १५ जण ठार झाल्याची माहिती इराकी सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.  सुवैब या पश्चिमी भागांतील मेंढय़ांच्या बाजारात शुक्रवारी दुपारी हा स्फोट झाला. यात पाच जण ठार, तर १३ जण जखमी झाले. काही अंतराने राधवानियाहजवळील व्यापारी स्थळानजीक आणखी एका बॉम्बचा स्फोट झाला. यात दोन जण ठार तर नऊजण जखमी झाले. इतर ठिकाणी झालेल्या तीन स्फोटांत आठजण ठार झाले. ‘आयसीस’ संघटननेच्या दहशतवाद्यांकडे असलेला पूर्व राजधानीकडील प्रदेश सुरक्षा दलांनी पुन्हा मिळवला. २०११ मध्ये अमेरिकेने इराकमधील सैन्य मागे घेतल्यापासून देशातील अनेक भागांत अशांतता आहे. ‘आयसीस’ने इराकच्या तृतीयांश भागावर कब्जा मिळवला होता.