जागतिक आश्चर्यापैकी एक आणि पृथ्वीतलावरील सर्वात सुंदर वास्तू म्हणून आग्य्राच्या ताजमहालची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहोचली असली, तरी ‘देवभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या निसर्गसौंदर्यानेच परदेशी पर्यटकांना अधिक भुरळ पाडली आहे. ‘गुगल’ने २०१२ या वर्षांत इंटरनेटवर सर्वाधिक शोध घेण्यात आलेल्या भारतीय पर्यटनस्थळांचा आढावा घेतला असता, केरळला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
गुगलच्या ‘झीटगीस्ट’ या वेबसाइटवर जगभरातून करण्यात आलेल्या भारतीय पर्यटनस्थळांच्या ‘ऑनलाइन सर्च’च्या आधारे सर्वाधिक पसंतीच्या दहा ठिकाणांची यादी करण्यात आली आहे. त्यामध्ये केरळ पहिल्या स्थानी आहे, तर ताज महल दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे केरळमधील मुन्नर हे हिल स्टेशन स्वतंत्ररीत्या यादीत नवव्या स्थानी आहे.
‘पर्यटनाबाबत ऑनलाइन प्रसिद्धीतंत्रात केरळ आघाडीवर आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात पोहोचणारे केरळ हे पहिले राज्य आहे. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातूनही आम्ही आमच्या पर्यटनस्थळांबाबत प्रचार करतो,’ असे केरळचे पर्यटन सचिव सुमन बिल्ला यांनी सांगितले.
केरळ टुरिझमच्या वेबसाइटवर दरमहा अडीच लाखहून अधिक नेटिझन्स भेट देतात, तर दरवर्षी ६० लाखांहून अधिक जण यूटय़ुबवरून केरळमधील पर्यटनस्थळांबाबतच्या चित्रफिती पाहतात, अशी माहिती राज्य सरकारने दिली.
काय आहे झीटगीस्ट?
‘झीटगीस्ट’ या गुगलच्या वेबसाइटवर २०१२मध्ये सर्वाधिक शोध कोणकोणत्या गोष्टींचा घेतला गेला, यावर आधारित सर्वेक्षण घेण्यात येते. सर्वाधिक शोध घेण्यात आलेल्या गोष्टीला गतवर्षीपेक्षा जास्त हिट्स असल्यास ती प्रचलित (ट्रेंडिंग) मानली जाते.    
सर्वाधिक शोध घेतलेली भारतीय स्थळे

 केरळ                 ताजमहल
वाघा सीमा            वैष्णोदेवी
अमरनाथ               काश्मीर
शिर्डी            रामेश्वर मंदिर
मुन्नर       गेट वे ऑफ इंडिया