२०१२ चा ऑगस्ट महिना दिल्लीकरांना अजूनही आठवतोय! रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. जनलोकपाल का काय म्हणतात त्यासाठी. अण्णांभोवती अरविंद केजरीवाल, भूषण पितापुत्र, किरण बेदी, कुमार विश्वास, सिसोदिया..यांचे जाळे होते. आज यातील प्रत्येक जण कुणातरी राजकीय पक्षात तरी आहे! बाजूला पडलेत ते अण्णा हजारे. अण्णांची आठवण दिल्लीकरांना अधूनमधून येते. प्रचार जाहिरातीत अण्णांच्या फोटोला (भाजपच्या भाषेत कॅरिकेचरला) हार चढवला गेला. त्यावर- अण्णांना जिवंतपणी हार चढवल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. अण्णांची आठवण राजकीय पक्षांना झाली. अण्णांच्या आंदोलनामुळे केजरीवाल मोठे झाले. छे ! कुणीतरी म्हणे अण्णांचे आंदोलनच केजरीवाल चालवत होते.
    आता यात खरं काय नि खोटं काय अण्णा जाणोत. म्हणजे तुम्हा-आम्हाला नाही पटणार-पण असं म्हणतात बुवा- आंदोलनादरम्यान अण्णांच्या त्या वेळच्या दोघा स्वीय साहाय्यकांना  बडय़ा काँग्रेस मंत्र्यांचा ‘पीआर’ सांभाळणाऱ्यांनी टॅब दिले होते. एका हिंदी वृत्तपत्रात हे छापून आले नि अण्णांचे आंदोलन कुणीतरी ‘चालवत’ असल्याची चर्चा सुरू झाली.हल्ली रामलीला मैदान सुने-सुने भासते. त्या मैदानावर आंदोलनानिमित्त फिरकलेल्यांना अण्णांची आठवण होत असते.  अण्णांची आठवण काढायला दिल्लीकरांना काहीतरी कारण हवे असते. हल्ली गांधी टोपीवर ‘झाडू’ फिरवून केजरीवाल गल्लोगल्ली प्रचार करीत आहेत. प्रत्येक भागातून अण्णांच्या आंदोलनात त्या वेळी लोक सहभागी झाले होते. अजूनही अनेकांच्या घरी अण्णांसोबतचा फोटो आहे. नवी दिल्लीचा परिसर तर अण्णा समर्थकांचा बालेकिल्ला होता. आता या बालेकिल्ल्यातील घरांमध्ये अण्णांऐवजी अरविंद केजरीवाल यांच्यासमवेतचे फोटो आले आहेत. बाकी एक मात्र नक्की, अण्णांनी केजरीवाल यांना फोटो वापरू नको म्हणून तंबी दिली होती. पण आता भाजपनेच अण्णांचा फोटो (भाजपवाल्यांच्या भाषेत- कॅरिकेचर) वापरला आहे. त्यामुळे दिल्ली प्रदेश भाजपच्या कार्यालयात उत्साही वातावरण आहे. दररोज केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा होतात. त्यानंतर होते ती ‘डिब्रीफिंग’! त्यात (काही) नेते दिलखुलासपणे बोलतात. या डीब्रीफिंगमध्ये एका केंद्रीय मंत्र्यांना म्हटले- अण्णांचा फोटो वापरायला केजरीवाल यांना मनाई होती. आम्हाला नाही. आम्ही त्यांच्या फोटोचे कॅरिकेचर बनवून वापरले. आमची भूमिका स्पष्ट होती- आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी अण्णांच्या विचारांना तिलांजली दिली- त्याचे रूपक बनवून आम्ही कॅरिकेचरमध्ये वापरले. ही लढाई आत्ता सुरू झाली आहे. अण्णांना माहीत नसेल पण अधूनमधून केजरीवाल यांना त्यांची आठवण येत असते. ‘अन्नाजी के सपनों का लोकपाल लायेंगे’ – असं म्हटलं की केजरीवाल यांच्यासमोरचा ‘जनता परिवार’ हरखून जातो. परिवारातले ‘लोहिया के  लोग’ लोकपालच्या हिंदोळ्यावर झुलू लागतात. केजरीवाल यांच्या मुखातून अण्णांची थोरवी गायली जाते. पाहूया याचा काय परिणाम होतो ते!
-चाटवाला