आपल्या कर्मचाऱ्यांनी बाह्य़ा नसलेले कपडे, जीन्स व टी शर्ट घालू नयेत, असा आदेश गोव्याच्या कला व संस्कृती खात्याने जारी केला असून त्यावर काँग्रेस नेते अलेक्सिओ रेगिनाल्डो यांनी सडकून टीका केली आहे. लोकांना जो पोशाख योग्य वाटतो तो परिधान करण्याची मुभा असलीच पाहिजे,अगदी बिकिनी घालून कार्यालयात येण्यासही कुणाची आडकाठी नसावी,  अशी दुसऱ्या टोकाची भूमिका त्यांनी घेतली.
राज्यातील भाजप सरकार अशा प्रकारचे आदेश काढून लोकांचे लक्ष प्रशासनातील अपयशावरून उडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप रेगिनाल्डो यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, लोकांना कार्यालयात येताना जे कपडे परिधान करायचे ते करू द्या; अगदी बिकिनीसुद्धा घालण्यास परवानगी असली पाहिजे.
गोवा सरकारच्या कला व सांस्कृतिक खात्याने कर्मचाऱ्यांना औपचारिक पोशाख परिधान करण्यास सांगितले असून त्यात जीन्स, टी शर्ट, अनेक खिशांचे ट्राऊझर्स, बाह्या नसलेले कपडे कार्यालयीन वेळात व सांस्कृतिक संचालनालयाच्या कार्यक्रमात घालू नयेत, असे म्हटले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या आदेशाचे कठोर पालन करण्याच्या शक्यतेबाबत ठोस उत्तर देण्याचे टाळले. आपण ते नंतर बघू, असे त्यांनी सांगितले.
आमदार अटानसिओ मॉन्सेरात यांनी सांगितले की, कुठले कपडे परिधान करावेत हा व्यक्तिगत निर्णय आहे. प्रत्येकाने सरकारी कार्यालयात येताना चांगले व सुयोग्य कपडे घालावेत, पण पोशाखाबाबत काही संकेत असावेत की नाही हे कर्मचाऱ्यांना ठरवू द्यावे.