ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी हवाई दलप्रमुख एअरचीफ मार्शल (निवृत्त) एस. पी. त्यागी यांच्यासहित तीन आरोपींना १४ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने शुक्रवारी चौकशीनंतर माजी हवाई दलप्रमूख त्यागी, त्यांचे भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांना अटक करण्यात आली होती. तिन्ही संशयित आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

निवृत्तीनंतर एस. पी. त्यागी हे दोनवेळा इटलीला जाणे सीबीआयला खटकले होते. या दौऱ्यांची माहिती घेताना सीबीआयच्या हाती अनेक महत्वपूर्ण माहिती हाती लागली. प्रारंभीच्या तपासात त्यागी यांनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात लाच घेतल्याचे समोर आले होते. ही माहिती समोर आल्यानंतर सीबीआयने त्यागी यांची संपत्ती, बँक आणि त्यांनी २००४-०५ नंतर घेतलेल्या संपत्तीचा तपास केला.

संशयित आरोपींवर सुमारे ३६०० कोटी रूपयांत व्हीव्हीआयपींसाठी १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याप्रकरणी ४२३ कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये एस.पी. त्यागी यांच्यावर षडयंत्र रचणे आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
सीबीआयच्या मते या प्रकरणातील मध्यस्थ गुइडो हायस्चस्के आणि कार्लो गेरोसांनी एस. पी. त्यागी यांच्या भावापर्यंत लाच पोहोचवली होती. अंमलबजावणी महासंचालयाने यावर्षी एप्रिलमध्ये एस. पी. त्यागी यांना समन्स पाठवले होते. मे महिन्यात त्यागी यांच्या विदेश दौऱ्याची चौकशी केली होती.

दरम्यान, भारताने इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून ‘एडब्ल्यू १०१’ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार २०१० साली केला. हा करार ३,५४६ कोटी रुपयांचा होता. त्यातील ८ हेलिकॉप्टर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तर ४ अन्य कारणांसाठी वापरली जाणार होती.
पूर्वीची रशियन एमआय-८ ही होलिकॉप्टर आता कालबाह्य़ ठरू लागल्याने ती बदलण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. १९९९ साली प्रथम ही मागणी झाली. २००५ साली त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आल्या. या पहिल्या निविदांमध्ये ६००० मीटर उंचीवर काम करू शकतील अशी हेलिकॉप्टर हवी असल्याची अट घालण्यात आली होती. उंचीची (सव्‍‌र्हिस सीलिंग) ही अट संरक्षण मंत्रालयाने २००६ साली शिथिल करून ४५०० मीटरवर आणली. त्यामुळे या स्पर्धेतील अमेरिकेच्या सिकोस्र्की कंपनीच्या ‘एस-९२ सुपरहॉक’ हेलिकॉप्टरची संधी हुकली असे म्हटले जाते. निवडीसाठीच्या या अटी बदलल्याने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फायदा झाला आणि अटी बदलण्यात हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांचा हात असल्याचा संशय आहे.