पाकिस्तानविरुद्धच्या स्वातंत्र्यलढय़ात मानवतेस काळीमा फासणारेो गुन्हे केल्याच्या आरोपावरून सत्तारूढ अवामी लीग पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते मुबारक हुसेन यांना बांगलादेशच्या विशेष लवादाने सोमवारी फाशीची शिक्षा ठोठावली.
न्या. एम. इनायेतूर रहीम यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद-२ ने फाशीची शिक्षा ठोठावली. हुसेन यांच्यावर एकूण पाच आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोन आरोपांबद्दल लवादाने त्यांना दोषी धरले.
ब्राह्मणबारिया जिल्ह्य़ात २२ ऑगस्ट १९७१ रोजी ३३ नागरिकांच्या हत्येप्रकरणी हुसेन यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दुसऱ्या एका आरोपाबद्दल हुसेन यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. त्यांच्यावर हत्या, अपहरण, लूट आदी आरोपही ठेवण्यात आले आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला विरोध असणाऱ्या जमात-ए-इस्लामी या मूलतत्त्ववादी संघटनेशी हुसेन संलग्न होते.
पाकिस्तानच्या पराभवानंतर हुसेन यांनी अवामी लीग पक्षात प्रवेश केला. युद्धातील गुन्ह्य़ात हात असल्याचा आरोप असलेले ते सत्तारूढ पक्षाचे एकमेव नेते होते.