भ्रष्टाचाराचे आरोप असलेले माजी प्रशासकीय अधिकारी बाल किशन बन्सल यांनी मुलासह आत्महत्या केल्याचे उघड झाले. बन्सल यांनी त्यांच्या दिल्लीतील मधू विहार येथील निवासस्थानी आत्महत्या केली. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बन्सल यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या मुलाला मारले. यापूर्वी बन्सल यांना केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अटक करण्यात आली होती तेव्हा त्यांच्या पत्नी आणि मुलीने आत्महत्या केली होती.
कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या बन्सल यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यातच त्यांना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. आज सकाळी निलगिरी अपार्टमेंटमधील त्यांच्या घरात त्यांचा व त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांना मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यानुसार तपास करण्यात येत आहे.
बन्सल यांना सीबीआयने १६ जुलैला अटक केली होती. त्यांच्यावर मुंबईतील एका व्यक्तीकडून ९ लाख रुपयांची लाच मागतिल्याचा आरोप होता. त्यांच्याकडे अतिरिक्त सचिव पदाची जबाबदारी होती.