माजी सरन्यायाधीश अल्तामस कबीर यांचे कोलकात्यामध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. देशातील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश अशी त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.  कबीर यांनी त्यांच्या कारकीर्दीला १९७३ ला सुरुवात केली होती. आधी कोलकाता जिल्हा न्यायालय, नंतर कोलकता उच्च न्यायालय येथे त्यांनी वकिली केली.  वकील म्हणून त्यांची दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही शाखांवर मजबूत पकड होती. त्यांची १९९० मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड करण्यात आली होती. २००५ मध्ये त्यांची नियुक्ती झारखंडचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. अल्तामस कबीर यांची २९ सप्टेंबर २०१२ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी हे पद १८ जुलै २०१३ पर्यंत भूषवले.