नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीच्या (एनआयएफटी) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार चेतन चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एनआयएफटीच्या २००६मधील घटनेनुसार नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ किंवा वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ किंवा व्यावसायिकाची निवड करण्यात येते. या पदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. चेतन चौहान हे दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) उपाध्यक्ष आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीदेखील आहेत. मात्र, इतक्या व्यस्त वेळापत्रकातून आपण ‘एनआयएफटी’च्या अध्यक्षपदाला न्याय देऊ शकू असे त्यांनी सांगितले. माझा ६० टक्के वेळ डीडीसीए, २० टक्के वेळ ‘एनआयएफटी’ आणि २० टक्के वेळ खासगी जीवनासाठी असेल, असे चौहान यांनी स्पष्ट केले. माझी नियुक्ती सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग खात्याकडे या पदासाठी अनेक नावे पाठविण्यात आली होती. मात्र, पक्षातील लोकांनाच प्राधान्य देण्यात आले. मी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खेळाडू असून मला बँकिंग क्षेत्राचाही अनुभव असल्याचे सांगत चौहान यांनी स्वत:च्या नियुक्तीचे समर्थन केले.
‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यामुळे सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. चेतन चौहान यांच्या ‘एनआयएफटी’च्या अध्यक्षपदावरील नियुक्तीमुळेही अशाचप्रकारचा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. ट्विटरवर चौहान यांच्या नियुक्तीची जोरदार खिल्ली उडविली जात आहे.