नव्याने निर्माण झालेल्या तेलंगण राज्याचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची लवकरच निवड करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने पाच सदस्यांची समिती स्थापन केली असून, त्याच्या अध्यक्षपदी केंद्रीय दक्षता आयोगाचे माजी आयुक्त प्रत्युश सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तेलंगण आणि आंध्र प्रदेश राज्यांचा कारभार पाहण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवांमधील अनुभवी अधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी केंद्राने पाच सदस्यांची समिती नेमल्याचे कार्मिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रत्युश सिन्हा यांच्याव्यतिरिक्त आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव, गृह विभागातील विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा), पोलीस महासंचालक (वने व विशेष सचिव, पर्यावरण) आणि वन मंत्रालयाचे सदस्य आदींचा समावेश आहे.
ही समिती प्रशासकीय अधिकाऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी नेमली आहे. या समितीला तीन आठवडय़ांत संबंधित अधिकाऱ्यांची यादी केंद्र सरकारला सादर करावयाची आहे. तेलंगण हे देशाचे २९ वे राज्य असून २ जूनपासून स्वतंत्र राज्याचा कारभार सुरू होणार आहे. केंद्र सरकारने तेलंगण राज्याबाबत यापूर्वीच घोषणा केली आहे.