भाजप नेत्या आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालांकडे दोन वर्षांपासून पुद्दूचेरीची अतिरिक्त जबाबदारी होती.
राष्ट्रपती भवनातून किरण बेदी यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. सोपविण्यात आलेली जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल. राज्यपालपदासाठी माझा विचार करण्यात आला त्याबद्दल मी सरकारची कृतज्ञ आहे, अशी भावना बेदी यांनी व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-द्रमुक युतीने १७ जागांवर विजय मिळविताना सत्ता काबीज केली. नरेंद्र मोदी सरकारने वीरेंद्र कटारिया यांना पुद्दूचेरीच्या राज्यपालपदावरून हटविल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे पद रिक्त होते. अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल अजय सिंग यांच्याकडे पुद्दूचेरीची अतिरिक्त जबाबदारी होती.
१९७२ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेल्या बेदी यांनी २००७ मध्ये स्वेच्छानिवृत्ती पत्करली होती. त्यानंतर त्यांची पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या महसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीसाठी बेदी यांना रेमन मॅगसेस पुरस्काराने आणि यूएन पदकाने सन्मानित करण्यात आले होते.