संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी अफझल गुरू आणि मकबूल बट्टला शहीद म्हटल्याच्या आरोपावरून दिल्ली विद्यापीठाचे(जेएनयू) माजी प्राध्यापक एस.ए.आर.गिलानी यांना मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यांना आज कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे.
‘जेएनयू’तील संघर्ष चिघळला
गिलानी यांना पहाटे तीन वाजता संसद मार्ग पोलीसांनी भारतीय दंड विधान १२४ ए (देशद्रोह), १२० बी आणि १४९ कलमांअंतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी जतिन नरवाल यांनी दिली. ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर १० फेब्रुवारीला दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये गिलानी यांनी देशविरोधी भाषण ठोकले होते. भाषणात काश्मीरच्या स्वातंत्र्याचे आणि अफझल गुरू, मकबूल भट्ट यांचा उल्लेख शहीद असा केला होता. त्यानंतर गिलानींविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून गिलानी यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी संध्याकाळी प्राध्यापक गिलानी यांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गिलानी यांना अटक केली.
दरम्यान, याआधी २००१ साली संसदेवरील हल्लाप्रकरणी गिलानी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. परंतु, दिल्ली हायकोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले होते.