केंद्रीय गृह खात्याचे माजी सचिव मधुकर गुप्ता यांनी मुंबईवर झालेल्या २६\११ हल्ल्याच्यावेळी पाकिस्तानचा पाहुणचार झोडत असल्याचे आरोप शनिवारी फेटाळून लावले. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६\११ हल्ल्याच्यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये गृहसचिव पातळीवर बोलणी सुरू होती. त्यासाठी मधुकर गुप्ता यांच्या नेृतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये गेले होते. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा हे शिष्टमंडळ इस्लामाबदनजीक असणाऱ्या ‘मरी’ या हिल स्टेशनवर पाकिस्तानच्या पाहुणचाराची मजा लुटत होते, अशी माहिती उघड झाली होती. मात्र, गुप्ता यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून अशा गोष्टी का पसरवल्या जात आहेत, याची कल्पना नसल्याचे सांगितले. मरीमध्ये त्यावेळी सिग्नल नव्हता ही गोष्ट खोटी आहे. मला भारतातील माझ्या शेजाऱ्याने दुरध्वनीवरून कॉल करून मुंबईवरील हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही टीव्ही लावला. या हल्ल्याबद्दल समजल्यानंतर आम्ही भारतातील वरिष्ठ नेत्यांशी फोनवरून बोललो. मात्र, कोणालाही या हल्ल्याबद्दल माहिती नव्हती, असे गुप्ता यांनी सांगितले. मुंबईवरील हल्ल्याचीस पाकिस्तानची दुटप्पी भूमिका जगजाहीर आहे. मात्र, हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. मुंबईवर हल्ला झाल्यानंतर आम्ही सातत्याने भारतातील संबंधितांशी संपर्कात होतो, असे गुप्ता यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, ही माहिती उघड झाल्यानंतर आज सकाळापासून याप्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. देशावरील संकटाच्या काळात या अधिकाऱ्यांनी तिथे थांबण्याचा निर्णय का घेतला , असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, पाकने भारतीय अधिकाऱ्यांना त्याठिकाणी थांबवून घेणे हा मुंबई हल्ल्याच्या व्यापक कटाचा एक भाग असावा, असा संशयदेखील व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांच्या अचानक हल्ल्यानंतर भारताची निर्णयप्रक्रिया कोलमडून पडावी, जेणेकरून दहशतवाद्यांना होणारा प्रतिकार क्षीण व्हावा, असा पाकिस्तानचा हेतू असल्याचीही चर्चा आहे.