कुलभूषण जाधवप्रकरणात पाकिस्तानने गुरुवारी नवा कांगावा रचला आहे. कुलभूषण जाधव यांनी हेरगिरी केल्याची कबूली देत पाकच्या लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांनी केलेला दयेचा अर्जदेखील ट्विटरवर शेअर केला असून या अर्जात २००५- २००६ मध्येदेखील पाकमध्ये नौदलाची गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी गेले होते असा उल्लेख आहे.

भारताच्या नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. जाधव यांच्यावर हेरगिरी तसेच देशविरोधी कृत्य केल्याचे आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणात आता पाकिस्तानने नवी खेळी खेळली आहे. पाकिस्तानच्या इंटर- सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) जाधव यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केल्याचा दावा केला आहे. पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. जाधव यांनी हेरगिरी, दहशतवादी कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. ‘माझ्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले असून माझ्या या कृत्यांसाठी मला माफी द्यावी’ असे जाधव यांनी म्हटल्याचे पाकचे म्हणणे आहे. गफूर यांनी जाधव यांचा दयेचा अर्जदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र त्या अर्जावर जाधव यांची स्वाक्षरी नाही. त्यामुळे या अर्जाविषयी शंका उपस्थित होत आहे.

काय म्हटले आहे अर्जात?
कुलभूषण जाधव यांनी भारताच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम केल्याचे अर्जात म्हटले आहे. २००५ आणि २००६ मध्ये मी पाकिस्तानमध्ये गेले होतो. पाकच्या नौदलाविषयी गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी मला पाठवण्यात आले होते असे या अर्जात म्हटले आहे. कराची, बलुचिस्तान, क्वेट्टा या भागाची जबाबदारी जाधव यांच्याकडे होती असे या अर्जात म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये मी हुसैन मुबारक पटेल यानावाने वावरत होतो. बलुचमधील दहशतवाद्यांची भेट घेण्याचे काम मी करत होतो असा उल्लेखेही जाधव यांच्या कथित अर्जात दिसतो.