वैचारिक मतभिन्नता मांडण्याच्या हक्कांवर गदा आणणे, विचारवंतांवर हल्ला करणे या कृती कोणत्याही स्थिती कधीच स्वीकारार्ह नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी केले. देशातील सर्वच विचार करणाऱ्या लोकांनी या कृतीचा कठोर शब्दांत विरोध केला आहे. वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकणे हा एक प्रकारे लोकशाही तत्त्वांवरच हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून देशात वाद सुरू आहे. अनेकांनी वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून आपले राष्ट्रीय पुरस्कार परत केले आहेत. एकीकडे केंद्र सरकारमधील मंत्री देशात असहिष्णुतेचे वातावरण अस्तित्त्वातच नाही, असे सांगत असताना दुसरीकडे अनेक विचारवंत, कलाकार याबद्दल नाराज आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनमोहनसिंग यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, एकात्मता, वैविध्यता, धर्मनिरपेक्षता ही आपल्या देशाची वैशिष्ट्ये आहेत. देशाच्या प्रगतीसाठी आणि शांतता नांदण्यासाठी या वैशिष्ट्यांचा प्रत्येकानेच आदर केला पाहिजे. विचारवंतांवर हल्ला करणे, दुसऱ्या बाजूचा आवाज दडपून टाकणे या कृती कोणत्याही स्थितीत स्वीकारार्ह नाही. हे एक प्रकारे लोकशाही तत्त्वांनाच तिलांजली देण्यासारखे आहे.