आयुष्यातील बराच काळ राजकारणात घालवलेले माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे आपल्या आत्मचरित्रावरुन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यात त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक घडामोडींचे महत्वाचे खुलासे केले आहेत. यासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना आपण पंतप्रधान का होऊ शकलो नाही यावर मुखर्जी म्हणाले, पंतप्रधान न होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मला हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हती. मी स्वतःला पंतप्रधान बनवण्याच्या लायक समजत नव्हतो कारण, लोकांशा संवाद साधण्याचे हे प्रमुख साधन माझ्याकडे नव्हते.

या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुखर्जी हे पंतप्रधानपदासाठी आपल्यापेक्षा जास्त योग्य उमेदवार होते असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना मुखर्जी म्हणाले, मनमोहन सिंग स्वतः चांगले व्यक्ती आहेत. तसेच ते एक चांगले पंतप्रधानही होते.

त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांपैकी ते सर्वोत्कृष्ट नेता होते. माझ्याकडे देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या हिंदीची अडचण होती. त्यामुळे जनतेशी संवाद साधताना अडचणी येणार होत्या. त्यावेळी सोनिया गांधी पंतप्रधान होतील असे आम्हाला वाटत होते. मात्र, त्यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली हा त्यांचा निर्णय योग्य होता.

पंतप्रधान न होण्यामागील आणखी एक कारण सांगताना मुखर्जी म्हणाले, माझे गृहराज्यही याला कारणीभूत आहे. कारण, मी ज्या पश्चिम बंगाल राज्यातून आलो होतो तेथे गेल्या ३४ वर्षांपासून डाव्यांची सत्ता होती. डाव्यांना मला पंतप्रधानपदी बसवण्याची इच्छा नव्हती. मात्र, मनमोहन सिंग यांना ती अडचण नव्हती.