रामनाथ कोविंद यांनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून आज (मंगळवारी) शपथ घेतली. कोविंद यांचा शपथविधी सोहळा संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संपन्न झाला. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र या सोहळ्याला येण्यास एका व्यक्तीने अतिशय उशीर केला. विशेष म्हणजे अतिविशेष असा दर्जा असलेली ही व्यक्ती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यावर सेंट्रल हॉलमध्ये पोहोचली

प्रणव मुखर्जी यांच्या आधी राष्ट्रपतीपद भूषवलेल्या प्रतिभा पाटील यांनी शपथविधी सोहळ्याला पोहोचण्यास उशीर केला. प्रतिभा पाटील या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसल्या होत्या. मात्र प्रतिभा पाटील रामनाथ कोविंद यांचा शपथविधी पूर्ण झाल्यावर सेंट्रल हॉलमध्ये पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. माजी राष्ट्रपतीच राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला उशिरा आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यावर राष्ट्रगीत सुरु झाले. यानंतर सभागृहात ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली. शपथविधी सोहळा पूर्ण झाल्यावर उपस्थितांनी कोविंद यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील उपस्थित होत्या. मात्र ममता बॅनर्जी पक्षाच्या खासदारांसोबत मागील रांगेत बसल्या होत्या. ममता बॅनर्जी यांचा अपवाद वगळता सर्व मुख्यमंत्री पुढील रांगांमध्ये बसले होते. शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सेंट्रल हॉलमध्ये येताच ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी त्यांना त्यांच्यासोबत बसण्याचा आग्रह केला. पंतप्रधान मोदी यांचे कडवे विरोधक समजल्या जाणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये बराच काळ चर्चादेखील झाली.