घरात पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर कोमात गेलेले भाजपचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांना गुरूवारी विशेष दक्षता विभागात (आयसीयु) दाखल करण्यात आले. ताप आणि श्वसनाचा त्रास वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात निवासस्थानी पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सिंह यांना लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान, त्यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. तेव्हापासून डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते.
सिंह हे एनडीएच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून काम पाहिले आहे. बारमेरमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयानंतर भाजपमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, सध्या जसवंत सिंह यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना लवकरच आयसीयूमधून बाहेर काढू, असे डॉक्टरांनी सांगितले.