माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. अन्सारी हे शनिवारी केरळमधील कोझिकोड येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची (पीएफआय) सहयोगी संस्था नॅशनल वूमन फ्रंटने केले होते. विशेष म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी केली जात आहे. नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्जेक्टिव्ह स्टडीजने नॅशनल वूमन फ्रंटच्या सहकार्याने ‘द रोल ऑफ वूमन इन मेकिंग अ ह्यूमन सोसायटी’ या विषयावर एका परिषदेचे आयोजन केले होते. ‘द हिंदू’ ने दिलेल्या वृत्तानुसार भाजपने या प्रकरणी अन्सारींनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. पीएफआयवर केरळीमधील युवकांना दहशतवादी संघटना आयसीसमध्ये दाखल केल्याचा आरोप आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष पी.रघुनाथ यांनी निवेदन जारी करून निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जी व्यक्ती १० वर्षे भारताची उपराष्ट्रपती होती. त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेल्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमात जाणे चुकीचे आहे.

दुसरीकडे भाजयुमोनेही यावरून अन्सारी यांच्यावर टीका केली आहे. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष पी. प्रकाशबाबू यांनी केरळ सरकार अशा कार्यक्रमांच्या आयोजनाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. या कार्यक्रमात पीएफआयचे प्रदेशाध्यक्ष ई. अबूबकर आणि एनडब्ल्यूएफचे अध्यक्ष ए.एस.जैनबा हेही सहभागी झाले होते.

काय आहे पीएफआय ?
पीएफआय ही दक्षिण भारतातील विविध राज्यांत काम करणारी एक इस्लामिक संस्था आहे. जुलै २०१० मध्ये इस्लामचा अनादर केला म्हणून केरळमधील एका प्राध्यापकाचा हात या संघटनेच्या १३ कार्यकर्त्यांनी कापला होता. तेव्हा ही संघटना चर्चेत आली होती. एनआयएने या संघटनेचा अनेक दहशतवादी कृत्यात हात असल्याचा केंद्राला अहवाल दिलेला आहे. यामध्ये दहशतवादी कॅम्प चालवणे, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देणे आदींचा समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या मते, गृहमंत्रालयाने या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. एनआयए आपल्या समर्थनात चार कारणांचा हवाला दिला आहे. यामध्ये एक केरळमधील इडुक्की येथील प्राध्यापकाचा हात कापण्याची घटना, कन्नूरमध्ये दहशतवादी कॅम्प सुरू करणे. या ठिकाणावरून तलवार आणि बॉम्ब जप्त करण्यात आले होते. बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नेते रूद्रेश यांची हत्येबाबत आरोप आहेत. दरम्यान, पीएफआयने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान, हामिद अन्सारी यापूर्वी उपराष्ट्रपतिपदाचा कार्यकाल संपत असताना एका मुलाखतीत देशातील मुसलमान स्वत:ला असुरक्षित समजत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.