महोदय अमावास्येनिमित्त पवित्र स्नानाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी येथील भगवान अरुणाचलेश्वरर मंदिरातील जलकुंडात गर्दी केली असता झालेल्या चेंगराचेंगरीत चार जण बुडून मरण पावल्याची घटना सोमवारी घडली.
या मंदिरातील पुरोहित पवित्र त्रिशूळासह ‘अय्यन तीर्थवरी कुलम’ जलकुंडात स्नानासाठी उतरले असता जवळपास दोन हजार भाविकांनीही त्यांच्यासमवेत स्नानाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही दुर्घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.
बुडून मरण पावलेल्या चौघांची नावे पुन्नियाकोडी, व्यंकटरमण, शिवा आणि मणिकंदन अशी असून ते मंदिराच्या मुख्य पुरोहितांचे साहाय्यक होते, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकारानंतर पोलिसांनी जलकुंडाचे प्रवेशद्वार बंद केले असून चेंगराचेंगरीत सापडलेल्या जवळपास ५० जणांची सुटका केली.
रविवारी मध्यरात्रीपासूनच त्रिशूळाची पूजा सुरू झाली होती आणि त्यानंतर तीर्थवरी येथे पवित्र स्नान करण्यासाठी सोमवारी भाविक आले होते. पुरोहितांनी त्रिशूळ धरून पाण्यात डुबकी घेतली तेव्हा भाविकांनीही त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला त्या वेळी चेंगराचेंगरी झाली.
या दुर्घटनेत बळी पडलेल्यांचे मृतदेह हाती लागले असले तरी अग्निशामक दल आणि मदतकार्य पथकातील कर्मचारी अद्यापही काही जणांचा शोध घेत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.