जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गस्त घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर हल्ला चढवला आहे. काझीगुड भागात गस्त घालणाऱ्या या तुकडीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे अर्निया सेक्टरमध्ये सोमवारी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातला ट्विट केला आहे.

सोमवारी सकाळीच बारामुल्ला जिल्ह्यात एका शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. सोपोरमधील शानगेरगुंड भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोध मोहिमेला सुरुवात केली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

‘सुरक्षा दलांकडून शोध मोहिम राबवली जात असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले,अशी माहिती पोलिसांनी दिली. या भागात अद्याप शोध मोहिम सुरु असल्याची माहिती मिळते आहे. या घटना ताज्या असतानाच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. जखमी जवानांवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.