ऐन निवडणुकीत घातपात घडविण्याच्या कामगिरीवर असलेला इंडियन मुजाहिद्दीनचा पाकिस्तानातील कडवा अतिरेकी झिया उर रहमान उर्फ वकास (वय २५) याला तीन साथीदारांसह शनिवारी राजस्थानात दिल्ली पोलिसांनी अटक केली. वकास हा खतरनाक अतिरेकी असून आयएसआयने त्याला या कामगिरीवर पाठवले होते. देशातील अनेक बॉम्बस्फोटांतही त्याचाच हात होता.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी तो आला होता का, या प्रश्नावर विशेष पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव म्हणाले की, या घडीला तरी तसे काहीही स्पष्ट झालेले नाही. कोणताही विशिष्ट पक्ष वा विशिष्ट नेता त्यांचे लक्ष्य होता, असे आत्ता तरी स्पष्ट झाले नसून सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या काळात घातपाताची त्यांची योजना असावी, असे दिसत आहे. अर्थात चौकशी अत्यंत प्राथमिक अवस्थेत असून त्यामुळे काही सांगणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले.
वकास हा मुंबईतील वांद्रे येथून रेल्वेने शनिवारी सकाळी अजमेरला पोहोचताच त्याला अटक करण्यात आली. वकासच्या चौकशीत महम्मद महारूफ (वय २१), महंमद वकार अझर उर्फ हनीफ (वय २१, रा. जयपूर) व साकिब अन्सारी उर्फ खालीद (वय२५, रा. जोधपूर) या त्याच्या साथीदारांची नावे उघड झाल्यानंतर रविवारी पहाटे त्यांना त्यांच्या-त्यांच्या निवासस्थानांतून राजस्थान पोलिसांनी अटक केली. या तिघांनी हल्ल्याची काय तयारी केली आहे, याचा आढावा घेण्यासाठी आपण राजस्थानात आलो होतो, असे वकासने पोलिसांना सांगितले. जामियानगर येथील शाहीन बाग भागातील एक युवकही या तिघांच्या सतत संपर्कात होता. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी जाबजबाबासाठी ताब्यात घेतले आहे. अतिरेक्यांकडून मोठय़ा प्रमाणात स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. वकास हा प्रगत स्फोटकातील (आयइडी) तज्ज्ञ असून त्याला दिल्लीच्या विशेष न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. वकासची अटक हे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबई येथे दिली. अनेक हल्ल्यांमध्ये हात असलेल्या वकासला जेरबंद करण्यासाठी देशभर मोर्चेबांधणी केली गेली होती. शिंदे म्हणाले की, गेल्या ८-१० दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवली जात होती. आणखी दोन-तीन अतिरेक्यांना पकडण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. झवेरी बाजार येथील १२ जुलै २०११ रोजी झालेल्या स्फोटांसह अनेक प्रकरणांत वकास हवा होता. पण कोणत्या घातपाती मोहिमेवर तो आला होता, याचा उल्लेख करायचे शिंदे यांनी टाळले.
फोटोः इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना अटक