फ्रान्समधील मशिदीच्या इमारतींसाठी परदेशी अर्थपुरवठा तात्पुरता थांबवण्याच्या संकल्पनेस आपला पाठिंबा आहे, असे पंतप्रधान मॅन्युएल वॉल्स यांनी सांगितले. जिहादी दहशतवाद्यांनी देशातील अनेक हल्ल्यांची जबाबदारी घेतली असल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मॅन्युअल वॉल्स यांनी ल माँद या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एका जिहादी दहशतवाद्याने चर्चवर हल्ला केला हे सरकारचे अपयशच होते व त्या हल्ल्यात ख्रिश्चन धर्मगुरूला ठार करण्यात आले होते.

यातील हल्लेखोरास इलेक्ट्रॉनिक टॅग लावून सुनावणी प्रलंबित ठेवून सोडण्यात आले आहे. व्हॉल्स व अंतर्गत सुरक्षा मंत्री बेर्नार्ड कॅझेनेव्यू यांच्यावर सुरक्षा त्रुटींमुळे टीका झाली असून फ्रान्समध्ये गेल्या अठरा महिन्यात तीन हल्ले झाले आहेत. चर्चवरील हल्लेखोरांपैकी एक असलेल्या अदेल केरमिशे (वय१९) याच्यावर खटला प्रलंबित असून त्याच्यावर दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे पण त्याला इलेक्ट्रॉनिक टॅग लावण्यात आला असून प्रकरणनिहाय सुनावणी करणे योग्य ठरेल असे न्यायाधीशांनी म्हटल्याचे वॉल्स यांनी सांगितले.