जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याच्या भारताच्या भूमिकेला फ्रान्सने पाठिंबा दिला आहे. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ज्याँ मार्क आयराॅल्ट यांनी फ्रान्सच्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. अझरला दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या युएनमधल्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणणाऱ्या चीनवरही आयराॅल्ट यांनी नाव न घेता टीका केली.

“दहशतवादाचा मुकाबला करताना दुटप्पीपणे वागून चालणार नाही” आयराॅल्ट म्हणाले “काही दहशतवाद्यांना एक न्याय आणि काहींना दुसरा असं चालणार नाही” त्यांचा रोख चीनकडे होता.

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंबंधी भारताचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात. गेल्यावर्षी पठाणकोटमधल्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीकडे यासंबंधी प्रस्ताव नेला होता. चीनने अनेक तांत्रिक अडचणींचं कारण देत हा प्रस्ताव रोखला. पण भारताने हा मुद्दा लावून धरल्याने सुरक्षा समितीतला आपला नकाराधिकार वापरत चीनने भारताचा हा प्रस्ताव सरळसरळ फेटाळून लावला.  सुरक्षा समितीतल्या भारताच्या या प्रस्तावाला फ्रान्सने संयुक्तपणे पाठिंबा दिला होता.

चीनच्या जिनजियांग प्रांतात इस्लामी दहशतवादाची समस्या आहे. पाकिस्तानला लागून असणाऱ्या या प्रदेशातल्या दहशतवादाचा नायनाट व्हावा यासाठी चीन नेहमी तात्विक भूमिका घेतं. पण जिनजियांग प्रांतातल्या दहशतवाद्यांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त धोकादायक असलेल्या मसूद अझरला पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीन उघडपणे पाठिशी घालतो.

आधी हरकत-उल-मुजाहिदीनमधून कारवाया करणारा मसूद अझर भारताच्या ताब्यात आला होता. पण कंदाहार विमान अपहरण प्रकरणात अपहरणकर्त्यांच्या मागणीमुळे मसूद अझर आणि आणखी दोघा दहशतवाद्यांती सुटका भारताला करावी लागली होती. यानंतर पाकिस्तानमध्ये जाऊन मसूद अझरने जैश-ए-मोहम्मद ही अतिरेकी संघटना स्थापन केली. भारतात या अतिरेकी संघटनेच्या माध्यमातून अझरने अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. मसूद अझरचे तालिबान तसंच अल-कायदाशीही संबंध आहेत. पाकिस्तान सरकार तसंच पाकिस्तानी जनतेविरूध्दच्या अनेक दहशतवादी कारवायांमागे ‘जैश’चा हात असल्याचं म्हटलं जातं. मसूद अझरला आंतराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याच्या भारताच्या भूमिकेला फ्रान्सने पुन्हा पाठिंबा दिल्याने भारताती बाजू आणखी बळकट झाली आहे.