गोवा सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत इंटरनेट आणि टॉकटाईम देणारी योजना सुरू केली आहे. डिजीटल इंडिया अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे गोवा सरकारकडून सांगण्यात आले आहे. गोव्यातील एक लाखापेक्षा अधिक तरुणांना इंटरनेट आणि टॉकटाईम सेवा मोफत मिळणार आहे. ५ डिसेंबरपासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

तरुणांना मोफत इंटरनेट आणि टॉकटाईम पुरवण्यासाठी गोवा सरकारने वोडाफोन कंपनीसोबत करार केला आहे. या योजनेअंतर्गत १६ ते ३० वर्ष वयाच्या तरुणांना मोफत सिम कार्डसोबत दर महिन्याला १०० मिनिटांचा टॉकटाईम आणि ३ जीबीचा इंटरनेट डेटा वापरता येणार आहे. सरकारच्या या योजनेचा फायदा राज्यातील सव्वा लाख तरुणांना होणार आहे. ‘गोवा युवा संचार योजना सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. तरुणांसाठी ही खास योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा दुरुपयोग होत असल्यास ही योजना बंद केली जाईल,’ असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले आहे.

गोव्यात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेल्या सुभाष वेलिंगकरांनी भाजपला आव्हान दिले आहे. सुभाष वेलिंगकरांनी गोवा सुरक्षा मंचाची स्थापना केली आहे. गोवा सुरक्षा पक्ष आणि शिवसेना एकत्रितपणे आगामी निवडणूक होणार आहे. याशिवाय आम आदमी पक्षानेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील भाजप सरकारने तरुणांना आकर्षित करण्यासाठी डिजीटल इंडिया योजनेअंतर्गत नवी योजना सुरू केली आहे.

डिजीटल इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना आहे. लोकांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी या योजनेची घोषणा केली. यासाठी पंतप्रधान मोदींनी गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचीही भेच घेतली आहे. डिजीटल इंडिया उपक्रमांतर्गत देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा देण्यात आली आहे. मागीव वर्षी जुलै महिन्यात पंतप्रधान मोदींनी डिजीटल इंडिया योजनेची घोषणा केली. लोकांना सक्षम आणि अर्थव्यवस्थेला संपन्न करण्यासाठी सरकारकडून डिजीटल इंडिया योजनेला सुरुवात करण्यात आली. देशातील प्रत्येक गाव इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे.

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी नुकतीच जियोच्या मोफत सेवेचा कालावधी वाढवला आहे. यानुसार जियोची मोफत ४जी इंटरनेट सेवा ३१ मार्चपर्यंत उपलब्ध असेल. याआधी ही सेवा ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध होती.