संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या जगातील सर्वांत स्वस्तातील Freedom 251 या स्मार्टफोनच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी शुक्रवारी केला. विशेष म्हणजे भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीतच नवी दिल्लीमध्ये या स्मार्टफोनचे अनावरण करण्यात आले होते. नॉएडास्थित रिंगिंग बेल्स या कंपनीने बुधवारी २५१ रुपयांचा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल केला असून, त्याची नोंदणी सध्या सुरू आहे.
किरिट सोमय्या म्हणाले, फ्रीडम २५१ स्मार्टफोनच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाला आहे. आपण या कंपनीच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली असून, कंपनीकडे आवश्यक परवानेही नसल्याचे मला दिसून आले. या स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या रिंगिंग बेल्स कंपनीची सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तपासावीत, असे आदेश केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.