अवघ्या २५१ रुपयांमध्ये फ्रीडम २५१ हा मोबाईल देण्याचा दावा करणा-या रिंगिग बेल्स या कंपनीचे संचालक मोहित गोएल यांना  फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोएल यांच्या रिंगिग बेल्स कंपनीने १६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.

गेल्या वर्षी रिंगिग बेल्स या कंपनीने अवघ्या २५१ रुपयांमध्ये स्मार्टफोन देण्याची घोषणा करत देशभरात खळबळ माजवली होती. या घोषणेपासून रिंगिग बेल्स ही कंपनी वादाच्या भोव-यात सापडली आहे. आता या कंपनीचे संचालक मोहित गोएलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अयाम एंटरप्रायजेसने मोहित गोएलविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘फ्रीडम २५१’ या मोबाईलच्या वितरणासाठी नोव्हेंबर २०१५ मध्ये रिंगिग बेल्सने अयाम एंटरप्रायजेस या कंपनीशी संपर्क साधला होता. आम्ही रिंगिंग बेल्सला ३० लाख रुपये दिले होते. पण त्यांच्याकडून फक्त १६ लाख रुपयांचाच माल पुरवण्यात आला. पाठपुरावा केल्यावर आम्हाला एकूण १४ लाख रुपयांचा माल पुरवण्यात आला. पण उर्वरित १६ लाख रुपयांची मागणी केली असता आम्हाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असे अयाम एंटरप्रायजेसने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर गुरुवारी रात्री उशीरा मोहित गोएलला उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रिंगिग बेल्स या कंपनीचा ‘फ्रीडम २५१’ हा मोबाईल वादग्रस्त ठरला होता. कितीही कमी खर्चात मोबाइल विकसित केला तरी तो कमीत कमी २७०० रुपयांमध्ये बनू शकतो. यामुळे २५१ रुपयांमध्ये फोन बनणे शक्यच नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही केली जात आहे. विशेष म्हणजे वादाच्या भोव-यात अडकूनही ‘फ्रीडम २५१’ हा फोन विकत घेण्यासाठी देशभरातून तब्बल सात कोटी ग्राहकांनी नोंदणी केल्याचा दावा कंपनीने केला आहे. यातील फक्त ७० हजार ग्राहकांनाच फोन देण्यात आले आहे. तर उर्वरित ग्राहकांना फोन मिळणार की नाही याविषयी संभ्रम आहे. रिंगिग बेल्स ही कंपनी बंद होणार अशी चर्चाही आता सुरु झाली आहे. पण कंपनीच्या प्रवकत्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.