सलग दुसऱ्या दिवशी नेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. आज दुपारी १२ वा ४३ मिनिटांनी नेपाळसह दिल्ली, यूपी, बिहार आणि पंजाब, मध्यप्रदेश आणि आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.७ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपामुळे दिल्लीतील मेट्रो सेवा काही वेळासाठी बंद करण्यात आली होती.
या भूकंपात आत्तापर्यंत ८९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.  या प्रलयात ६० लोक मरण पावल्याची माहिती आहे. मात्र, बिहार सरकारने ३२ लोक मृत्यू पावल्याचे सांगितले. येथील मोतीहारी, दरभंगा आणि परिसरात अनेक घरं जमीनदोस्त झाली आहेत. तर रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच उत्तरप्रदेशात २९ जण मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तातडीने मदतकार्य सुरु केले आहे. पुन्हा बसलेल्या भूकंपाच्या झटक्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे एव्हरेस्ट शिखराजवळ हिमस्खलन झाल्याचे वृत्त आहे.