देशभरात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. जीएसटीमुळं करव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे, पण याचबरोबर इतर अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे बदल होणार आहेत. हे बदल काय आहेत, हे जाणून घेणं देशातील प्रत्येक नागरिकाला क्रमप्राप्त आहे.

जीएसटीमुळं करव्यवस्थेत मोठा बदल होत असला तरी इतर क्षेत्रातही बदल होणार आहेत. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. यासंबंधीची अधिसूचना आयकर विभागानं काढली आहे. १ जुलैपासून विवरणपत्र भरताना आधार कार्ड बंधनकारक असेल. आधार कार्ड क्रमांक दिला नाही तर आपल्याला विवरणपत्र भरता येणार नाही. पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. आधार्ड कार्ड पॅनला जोडले नाही तर पॅनकार्ड रद्द केले जाणार आहे. एकापेक्षा अधिक पॅन कार्ड तयार करून करचुकवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता पॅन कार्ड हवे असल्यास आधी आधारकार्ड काढावे लागणार आहे. आधार कार्ड काढल्याशिवाय पॅन कार्ड मिळणार नाही.

अनेक जण विदेश दौऱ्यावर जात असतात. अशा लोकांना १ जुलैपासून डिपार्चर फॉर्म अर्थात प्रस्थान अर्ज भरावा लागणार आहे. याशिवाय आधार कार्ड असला तरच पासपोर्ट मिळणार आहे. आधार कार्ड नसेल तर पासपोर्ट मिळणार नाही. आधार कार्डला पीएफ खाते क्रमांक जोडावे लागणार आहे. ३० जूनपर्यंत लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. रेल्वे कन्सेशनसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वेकडून मिळणाऱ्या सवलतींचा दुरुपयोग अनेक ठिकाणी झाल्याचे समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये देण्यात येणारी शिष्यवृत्ती आधार कार्ड नसेल तर मिळणार नाही. शिष्यवृत्ती मिळवायची असल्यास आधार कार्डची माहिती त्या-त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. त्यानंतरच शिष्यवृत्ती मिळू शकेल. सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटंट ज्यांना व्हायचे आहे. त्यांच्यासाठी १ जुलैपासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यात जीएसटीचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियानं भारतीयांसाठी ऑनलाईन व्हिसाची सवलत दिली आहे. १ जुलैपासून ती लागू होणार आहे. या माध्यमातून व्हिसाला तत्काळ मंजुरी मिळेल. सौदीतील कुटुंबीयांना कुटुंब कर भरावा लागणार आहे. त्यानुसार दरवर्षी सौदीतील नागरिकांच्या कुटुंबीयांना १७२१ रुपये कर भरावा लागेल. सौदीत मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्यास आहेत. त्यांनाही या ‘कटुंब करा’चा फटका बसणार आहे. रेशन दुकानांतही धान्य मिळवण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.