माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे काश्मीरच्या विकासाचे स्वप्न राज्यात सत्ता आल्यास भाजप पूर्ण करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत दिले. लोकशाही, मानवता व काश्मिरियत या वाजपेयींच्या शब्दांचा उल्लेख करत काश्मीरबाबत विशेष जिव्हाळा असल्याचे मोदींनी सांगितले.
भाजपला बहुमत दिल्यास विकासाचे स्वप्न पूर्ण करू, असे सांगत धर्म व राजकारणाचा संबंध सोडणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकार काश्मीरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मागची सरकारे भ्रष्टाचारी होती, केंद्रातून येणारा इतका निधी कुठे गेला, असा सवाल त्यांनी विचारला. जम्मू व काश्मीरवर राज्य करण्याचा मक्ता केवळ दोनच कुटुंबीयांनी घेतला आहे काय, असा सवाल करत अब्दुल्ला व मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यावर टीकास्त्र सोडले.