नेपाळमधील पारंपरिक ‘पशुबळी उत्सवात’ तब्बल ५००० म्हशींची नृशंस कत्तल करण्यात आली. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या अनिष्ट परंपरेविरोधात पशुप्रेमी नागरिकांनी जागृती अभियानासह शक्य ते सर्व प्रयत्न करूनही ही कत्तल रोखण्यात त्यांना यश आले नाही. भारतातूनही हजारो ‘भाविकां’नी या उत्सवास हजेरी लावली होती. नेपाळच्या दक्षिणेला असलेल्या बारा या जिल्ह्य़ातील बरियारपूर गावातील गढीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी हा उत्सव भरतो. पशुहत्येद्वारे हिंदू धर्मीय देवता गढीमाई हिला खूश करावे म्हणजे आपले नशीब फळफळते आणि आपल्या आयुष्यात समृद्धी येते अशी धारणा या उत्सवामागे असल्याचे येथे येणारे भाविक सांगतात.
शुक्रवारपासून या ‘पशुबळी उत्सवास’ सुरुवात झाली असून, सुमारे ४०० खाटिकांनी पहिल्याच दिवशी तब्बल ५००० म्हशींना ठार मारले. दोन दिवसांच्या या ‘उत्सवा’त हजारो बकऱ्या, डुकरं आणि कोंबडय़ा यांचीही कत्तल करण्यात येणार आहे, असे स्थानिकांनी सांगितले. पशुप्रेमींनी या प्रकाराचा ‘नृशंस’ आणि ‘अमानुष’ अशा शब्दांत धिक्कार केला असून आयोजक व सरकारी यंत्रणेने मात्र परंपरागत उत्सव असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले आहे.
दरम्यान, बिहारहून येथे आलेल्या एका वृद्धेचा तसेच एक वर्षीय बालकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.