भारतातील रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून रस्ते सुरक्षा कार्यक्रम राबविण्यासाठी आर्थिक देणग्या देणाऱ्यांना प्राप्तिकरात १०० टक्के सवलत देण्यात यावी, अशी सूचना रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे केली.
भारतात दरवर्षी रस्ते अपघातात हजारो लोक मृत्युमुखी पडतात आणि ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत सन २०१२ या वर्षी भारतातील विविध भागांत रस्त्यांवर सुमारे पाच लाख अपघातात १ लाख ३८ हजार लोकांनी प्राण गमावले आहेत, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. यामुळे सामाजिक हानीबरोबरच जीडीपीच्या स्तरावर दोन ते तीन टक्के आर्थिक हानीही झाली आहे, असे ते म्हणाले. गडकरी यांनी यासंबंधी अर्थमंत्री अरुण जेटली यांना एक पत्र पाठवून ही बाब मांडली आहे. मंजूर झालेल्या रस्त्यांच्या सुरक्षा कार्यक्रमासाठी आर्थिक योगदान देणाऱ्यांना प्राप्तिकरात ‘कलम ८० जीसीए’ अंतर्गत १०० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव गडकरी यांनी जेटली यांच्याकडे मांडला आहे. याच संदर्भात माहिती आणि तंत्रज्ञान, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग मंत्रालयांकडेही अपघातांची संख्या कमी करण्याबद्दल  विनंती केली आहे. परंतु आणखीही काही करण्याची आवश्यकता असल्याचे गडकरी म्हणाले. या प्रश्नाचे गांभीर्य आणि तीव्रता एवढी आहे की आणखीही पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.