गुडगावचा कुख्यात गँगस्टर संदीप गडोली ७ फेब्रुवारी रोजी चकमकीत ठार झाल्याच्या प्रकरणावरून गुडगाव पोलीस आणि मुंबई पोलीस एकमेकांसमोर ठाकले आहेत. मुंबई पोलिसांनी या चकमकीस खोटी ठरवत या प्रकरणी एसआयटीची नियुक्तीदेखील केली आहे. दुसरीकडे गुडगाव पोलीस या एनकाऊंटरला योग्य ठरवत आहे. मुख्य साक्षीदार आणि आरोपी दिव्या पहुजाच्या गायब होण्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. २० वर्षीय दिव्या संदीपच्या हत्येनंतर गायब झाली असून, ज्यावेळी गुडगाव पोलिसांनी गडोलीचा एनकाऊंटर केला, त्यावेळी ती त्याच्यासोबतच होती. यामुळे दिव्या ‘हाय रिस्क विटनेस’ झाल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे.

दिव्याचे वडील अशोक पहुजा यांनीदेखील आपली मुलगी गायब असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात त्यांची पत्नी सोनियादेखील आरोपी आहे. अद्याप तिला पकडण्यात यश आले नसून, ती हरिद्वारमध्ये असल्याचे अशोक यांचे म्हणणे आहे. दिव्याचा ‘हनीट्रॅप’ म्हणून वापर करण्यात आल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.

सुरुवातीला आयटी कंपनीत कामाला असलेली दिव्या नंतर मॉडेलिंग क्षेत्रात आल्याची माहिती फळांचा ठेला लावणाऱ्या तिच्या वडिलांनी दिली. मुलीच्या मित्रपरिवाराने गडोलीचा रिषव म्हणून तिच्याशी परिचय करून दिला होता. ४ फेब्रुवारी रोजी मनिष खुराना आणि दीपू हे दोघे रात्री ११ वाजता आमच्या घरी आले. एका कामानिमित्त आपण जयपूरला जात असल्याचे दिव्याने सांगितले. आम्ही तिला थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु, तिने न ऐकल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. ८ फेब्रुवारी रोजी चकमकीबाबत समजल्याची माहिती त्यांनी दिली.

ashok-pahuja
दिव्याचे वडील अशोक पहुजा यांनीदेखील आपली मुलगी गायब असल्याचा दावा केला आहे. (Express Photo)

 

याविषयी अधिक माहिती देताना अशोक म्हणाले की, ज्या व्यक्तीची रिषव म्हणून ओळख करून देण्यात आली होती तो गँगस्टर असल्याचे दिव्याने सांगितले. जयपूरनंतर मुंबईला गेल्याची माहिती तिने दिली. रिषव काही काळासाठी तिच्या खोलीत आल्याचे तिने सांगितले. कोणीतरी दरवाजा ठोठावल्यावर त्याने दरवाजा उघडल्याचे तिने आम्हाला सांगितले. ती म्हणाली, काही जण खोलीत घुसले आणि गडोलीने रिवॉल्ववर बाहेर काढले. नंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. त्यानंतर २२ तारखेला ती घरी परत आली आणि दोन दिवसांनी परत निघून गेली. आता ती आमच्याजवळ राहात नाही, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली.

दिव्याचा जबाब मॅजिस्ट्रेटसमोर नोंदविण्यात आला असून, तिच्या उपस्थितीने आमच्या केसला अधिक मजबूती मिळेल, असे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईला येण्यासाठी दिव्यानेच गडोलीची मनधरणी केली होती. त्याचबरोबर ती प्रत्येक गोष्टीची माहिती तिच्या आईला देत होती आणि तिची आई ही महिती पोलिसांना देत होती, असेदेखील या अधिकाऱ्याने सांगितले.