गुडगाव – येथील सुशांत लोक भागात एका अतिथीगृहात सात जणांनी एका २२ वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला पश्चिम बंगालची असून तिच्यावर कपील व त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला असे सहायक पोलिस आयुक्त राजेशकुमार यांनी सांगितले. ही तक्रार सकाळी नोंदवण्यात आली. सदर महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी सांगितले, की त्या महिलेच्या माहितीनुसार ती कपीलला ओळखत होती, गुन्हा घडला तेव्हा ती त्याला बाजारात भेटली व नंतर ते अतिथीगृहात गेले. तेथे कपीलच्या सहा साथीदारांनी त्यांच्या खोलीत प्रवेश करून तिच्यावर बलात्कार केला. या साथीदारांकडे बंदुका होत्या.
या प्रकरणी भादंवि व शस्त्रास्त्र कायद्यानुसार प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे व आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

उत्तराखंडमध्ये अपघातात १७ ठार
डेहराडून- पिठोरगड येथून दिल्लीला जाणारी एक बस शनिवारी दुपारी अलमोरा जिल्ह्य़ात दरीत कोसळून झालेल्या अपघातात १७ जण ठार तर २५ जण जखमी झाले आहेत.
उत्तराखंड परिवहन मंडळाची सदर बस ४० प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे जात असताना अलमोर जिल्ह्य़ातील धायरी येथे एका १०० फूट दरीत कोसळली त्यामध्ये १५ प्रवासी जागीच ठार झाले, असे पोलीस उपमहानिरीक्षक पुष्कर सैलाल यांनी सांगितले.या दुर्घटनेत जखमी झालेल्या २५ प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अद्यापही मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला
श्रीनगर : काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्य़ातील मचील क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न शनिवारी सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला. मचील क्षेत्रातील सरदारी नारजवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांचा एक मोठा गट घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दक्ष सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला.
तेव्हा प्रत्युत्तरादाखल सुरक्षा रक्षकांनीही गोळीबार केला त्यामध्ये एक अज्ञात दहशतवादी ठार झाला. त्याच्याकडून एक रायफल आणि स्फोटकांचा साठा हस्तगत करण्यात आला. ठार झालेला दहशतवादी कोणत्या गटाचा होता ते अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.

चिलीत मोठा भूकंप
सँटियागो – दक्षिण चिलीमध्ये शक्तिशाली भूकंप झाला असून अद्याप कुठल्याही हानीचे वृत्त नसल्याचे राष्ट्रीय आपत्कालीन केंद्राच्या हवाल्याने देण्यात आले.
चिलीतील नौदलाच्या जलशास्त्र व महासागरशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार सुनामी लाटांची कुठलीही चिन्हे दिसलेली नाहीत. अमेरिकी भूगर्भशास्त्र संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर होती व रात्री १० वाजून ६ मिनिटांनी हा भूकंप झाला. त्याचे केंद्र १० किलोमीटर खोल होते. भूकंपाचे केंद्र वायव्येला ८८ किलोमीटर अंतरावर तर सँटियागोपासून नैर्ऋत्येला ४३० किलोमीटर अंतरावर कॉनसेप्सिऑन येथे होते.