चीनकडून आपण देवाच्या मूर्ती आयात करीत असलो तरी त्या देशातून येणाऱ्या गणेशाच्या मूर्तीचे डोळे हळूहळू बारीक होत चालले आहेत, अशा शब्दात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कोपरखळी हाणली. चिनी लोकांचे डोळे बारीक असतात त्याचा अप्रत्यक्ष उल्लेखच त्यांनी या विधानातून केला.
र्पीकर यांनी ‘डिझाइन अँड मेक इन इंडिया इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयावर बोलताना सांगितले, की आपल्याला भेटवस्तू म्हणून गणपतीच्या मूर्ती मिळतात, अलिकडे या मूर्तीचे डोळे बारीक होत चालले आहेत त्यामुळे एक दिवस आपण मूर्ती उलटी करून पाहिली तर त्यावर मेड इन चायना लिहिलेले होते. राजा रवि वर्माच्या चित्रांवरून भारताने सरस्वती व गणेशासारख्या देवदेवतांची चेहरेपट्टी तयार केली, त्यात बदल होत चालला आहे. त्यामुळे आपण आपल्याच देवतांच्या मूर्ती तयार करून मेक इन इंडियाची भेट त्यांना दिली पाहिजे.
लोकसंख्येच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की आपण लहान होतो तेव्हा एका अणुबॉम्बने हा प्रश्न सुटेल असे वडील गमतीने सांगायचे, त्या वेळी लोकसंख्या ३५ कोटी असूनही त्यांना ती समस्या वाटत होती. लोकसंख्या जास्त आहे म्हणून भारतात तरुणांची संख्या जास्त आहे.
अतिरेक्यांना उत्तर म्हणून अतिरेकी तयार करण्याच्या त्यांच्याच विधानावर विचारले असता त्यांनी सांगितले, की त्यावर पाकिस्तानला काय वाटते याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही पण त्यांना अगदी आंध्रची मिरची लागली आहे.