गोरक्षक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असून त्यांना आवर न घातल्यास देशात अराजक माजेल, असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. ‘भाजप आणि भाजपशासित राज्य सरकारे गोरक्षकांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नाही. भाजप सरकारांकडून गोरक्षकांना मोकळीक दिली जाते,’ असा आरोप ओवैसी यांनी केला.

‘देशभरात अनेक ठिकाणी गोरक्षकांकडून हल्ले केले जात आहेत. मात्र हल्लेखोरांवर भाजपशासित राज्य सरकारांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. गाईंची वाहतूक करणाऱ्या लोकांवरही हल्ले झाल्याच्या घटना नुकत्याच जम्मू आणि दिल्लीमध्ये घडल्या. गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आतापर्यंत गोरक्षकांनी नऊ जणांच्या हत्या केल्या आहेत आणि दोन महिलांवर अत्याचार केले आहेत,’ असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले.

‘गोरक्षक दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहेत. गोरक्षकांकडून दहशत पसरवणारी कृत्ये केली जात आहेत. त्यांची मनमानी सर्रासपणे सुरु आहे. देशातील अनेक भागांमध्ये लोकांना मारहाण केली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. संपूर्ण देशभरात हा चिंतेचा विषय बनला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास देशातील अराजक आणखी वाढेल,’ असेदेखील असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले.

‘गोरक्षकांच्या उच्छादाविरोधात भाजपने कठोर भूमिका घेतलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभरातील घटनांमुळे उत्साहित आहे. कारण संघाची भूमिकादेखील भाजपसारखीच आहे. पंतप्रधान मोदी गोरक्षकांना हिंसा न करण्याचे आवाहन करतात. मात्र पंतप्रधान केवळ बोलतात. कृती करत नाहीत. सरकारने हिंसक कृत्ये करणाऱ्या गोरक्षकांविरोधात कठोर कारवाई करावी,’ असेही ओवैसी यांनी म्हटले.

‘भाजपला हिंदुत्वाचा मुद्दा रेटायचा असल्यास त्यांनी तो पुढे घेऊन जावा. याचे काय परिणाम होतात, हे देशाला पाहू देत,’ असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले. ओवैसींनी देशातील विविध भागांमध्ये काश्मिरी तरुणांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. ‘देशात मुस्लिमांविरोधात वातावरण तयार केले जात आहे. गोसंरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांना मारहाण केली जाते आहे. काश्मिरी तरुणांना मारहाण होण्याच्या घटनादेखील वाढत आहेत,’ असेदेखील ओवैसी यांनी म्हटले.