हमासची सत्ता असलेल्या गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरूच असून, बुधवारी दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यांमध्ये ६५० पॅलेस्टाइन नागरिक आणि ३१ इस्रायली नागरिक ठार झाले. या भागातील रक्तसंघर्ष संपुष्टात यावा यासाठी अमेरिकेसह अनेक देश प्रयत्नशील आहेत, मात्र हा संघर्ष थांबविण्यास इस्रायल आणि हमास यांनी नकार दिला आहे. अमेरिकेचे प्रशासकीय अधिकारी जॉन केरी यांनी दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करावी, अशी मागणी केली आहे.
इस्रायलला जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तेल अवीव येथील बेन-गुरिओन या इस्रायलमधील सर्वात मोठय़ा आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्रे थांबविण्यात आलेली आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक देशांनी इस्रायलकडे जाणारे विमानोड्डाणच रद्द केले.
आंतरराष्ट्रीय विमानांच्या सुरक्षेसाठी इस्रायलने प्रयत्न करावेत, अशी सूचना अमेरिकेने केली आहे. जॉन केरी यांनी बुधवारी तेल अवीव येथे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. अमेरिकेच्या इस्रायलकडे जाणाऱ्या विमानांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. हमासशासित गाझा पट्टय़ात क्षेपणास्त्रांचा धोका असल्याने विमानप्रवास धोक्यात आहे, असे केरी यांनी सांगितले.
गाझा पट्टीतील संघर्षांवर तोडगा निघावा आणि दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर करावी यासाठी केरी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी नेतान्याहू आणि पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सूचनेनुसार केरी यांनी मंगळवारी इजिप्तच्या राष्ट्रप्रमुखांशी आणि अरब लीगच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. दोन्ही देशांतील रक्तसंघर्ष तात्काळ समाप्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केरी यांनी केले होते.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष बान की-मून यांनीही या प्रकरणी लक्ष घातले आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केली नाही तर आमच्या फौजा पाठवून शक्य तितक्या लवकर शस्त्रसंधी घडवून आणू, असे मून यांनी सांगितले.
इस्रायलचे सैनिक नोबेलसाठी पात्र
इस्रायली सैनिकांनी संयमाने हमासच्या अतिरेक्यांना तोंड दिले, त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळायला हवे, असे मत इस्रायलचे अमेरिकेतील राजदूत रॉन डर्मर यांनी व्यक्त केले. त्यांचे भाषण ‘फेसबुक’वर टाकण्यात आले असून, त्यांनी हमासच्या रॉकेटहल्ल्याची तुलना दुसऱ्या महायुद्धातील लंडन बॉम्बफेकीशी केली आहे. इस्रायलवर बेपर्वाईने वंशहत्येचा आरोप केला जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.