24 October 2017

News Flash

काँग्रेसच्या काळात ८ वेळा विकास दर ५.७ टक्क्यांच्या खाली; टीकाकारांना मोदींचे उत्तर

काही लोकांना निराशा पसरवण्याची सवय असते

नवी दिल्ली | Updated: October 4, 2017 7:38 PM

मोदींनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मुद्देसूदपणे काँग्रेस सरकारने शेवटच्या तीन वर्षांत आणि मोदी सरकारच्या पहिल्या तीन वर्षांत केलेल्या कामांमधील फरक दाखवून दिला.

काँग्रेसच्या काळात सहा वर्षात आठ वेळा विकास दर ५.७ टक्क्यांपर्यंत खाली आला होता, अशी आठवण करुन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काही लोकांना निराशा पसरवण्याची सवय असते, अशा लोकांना लगेच ओळखणे गरजेचे असते, असे सांगत मोदींनी यशवंत सिन्हा आणि अरुण शौरींना टोला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर टीका होते आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. तर वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनीदेखील मोदी सरकारला खडे बोल सुनावत  ‘घरचा आहेर’ दिला. या टीकेवर मोदींनी बुधवारी उत्तर दिले.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) सुवर्ण महोत्सवानिमित्त बुधवारी दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदी उपस्थित होते. आपल्या भाषणात मोदींनी सरकारने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. मोदींनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मुद्देसूदपणे काँग्रेस सरकारने शेवटच्या तीन वर्षांत आणि मोदी सरकारच्या पहिल्या तीन वर्षांत केलेल्या कामांमधील फरक दाखवून दिला. केंद्र सरकारने रस्ते आणि महामार्गांच्या निर्मितीमध्ये १ लाख ८३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. लोहमार्गांचा विकासही दुप्पटीने केला जात आहे. काँग्रेस सरकारने शेवटच्या तीन वर्षांत १, ३०० किमी रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण केले, मात्र आम्ही गेल्या ३ वर्षांत २, ६०० किमी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण केले, असे त्यांनी सांगितले.

सकल राष्ट्रीय उत्पादनातील रोकड व्यवहारांचे प्रमाण नोटाबंदीपूर्वी १२ टक्के होते. ते नोटाबंदीनंतर ९ टक्क्यांवर खाली आले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस भ्रष्टाचार मुक्ती दिन असून, काळ्या पैशांविरोधात सफाई मोहीम सुरु आहे. ‘हम लकीर के फकिर नही’, आम्हाला सर्व माहिती आहे, असे देखील आमचे म्हणणे नाही, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे देशात विकासाचे नवीन पर्व सुरु होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

काही मुठभर लोक देशाची प्रतिष्ठा आणि प्रामाणिक समाजव्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांविरोधात कारवाई सुरु केली असून, प्रामाणिक करदात्यांच्या हितांचे रक्षण केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

First Published on October 4, 2017 7:33 pm

Web Title: gdp growth dipped to 5 7 per cent 8 times during upa regime pm narendra modi hits back congress yashwant sinha