गीता ही भारत आणि पाकिस्तानची कन्या आहे, ती भारत-पाकिस्तान ऐक्याचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात जवळपास एका दशकाहून अधिक काळ वास्तव्य केलेली मुकी आणि बहिरी भारतीय मुलगी गीता हिने मंगळवारी राष्ट्रपतींची भेट घेतली तेव्हा त्यांनी गीताला भरभरून आशीर्वाद दिला.

राष्ट्रपती भवनात गीता हिने मंगळवारी प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली, त्यावेळी तिच्यासमवेत पाकिस्तानच्या इधी प्रतिष्ठानचे अधिकारी हजर होते. या अधिकाऱ्यांनीच तिचा सांभाळ केला होता. मुखर्जी यांनी या वेळी बिल्किस बानो इधी आणि इधी प्रतिष्ठानचे आभार मानले.
लाहोर रेल्वे स्थानकात समझोता एक्स्प्रेसमध्ये १५ वर्षांपूर्वी एक सात-आठ वर्षांची मुलगी एकटीच बसलेली असल्याचे पाकिस्तानच्या रेंजर्सना आढळले होते. आता ही गीता २३ वर्षांची असून सोमवारी तिला भारतात आणण्यात आले.