अमेरिकेतील ख्यातनाम कार उत्पादक कंपनी भारतात कारची विक्री बंद करणार आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत जनरल मोटर्सच्या कारची विक्री बंद होणार असून गेल्या दोन दशकांपासून भारतीय बाजारातील स्वतःचा हिस्सा वाढवण्यात अपयश आल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते. जनरल मोटर्सच्या या निर्णयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या मोहीमेलाही हादरा बसणार आहे.

जनरल मोटर्स ही कंपनी गेल्या दोन दशकांपासून भारतातील आपला हिस्सा वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. पण अजूनही ऑटोमोबाईल सेक्टरमधील कंपनीचा हिस्सा एक टक्क्यांच्या पुढे जाऊ शकलेला नाही. आता कंपनीने पूनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून यानुसार भारतातील कारची विक्री बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. आता वर्षाच्या शेवटी बाजारात शेवरोलेटच्या गाड्या दिसणार नाही. भारतात गाड्यांची विक्री बंद होणार असली तरी भारतातून कंपनीने पूर्णपणे गाशा गुंडाळलेला नाही असे कंपनीतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. बंगळुरु आणि पुण्याजवळील तळेगाव येथील उत्पादन प्रकल्प सुरु ठेवले जाणार आहे. या उत्पादन प्रकल्पांमध्ये तयार होणाऱ्या गाड्यांची निर्यात केली जाणार आहे. याशिवाय गुजरातमधील प्रकल्प एसएआयसी मोटर कॉर्पोरेशनला विकण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
भारतमध्ये तयार होणाऱ्या लॅटीन अमेरिका आणि अन्य देशांमध्ये निर्यात केल्या जातात. ३१ मार्च २०१७ पर्यंत कंपनीने ७० हजार ९६९ गाड्यांची निर्यात केली आहे. तर तळेगावमधील प्लॅन्टची १ लाख ३० हजार गाड्या तयार करण्याची क्षमता आहे.