पत्रकार हमीद मीर यांच्या हत्येच्या प्रयत्नासंदर्भात केलेल्या आरोपांबाबत पाकिस्तानातील जंग समूहाच्या मालकीच्या असलेल्या जिओ टीव्हीने पाकिस्तानी लष्कर, आयएसआय ही गुप्तचर संस्था व त्यांच्या प्रमुखांची माफी मागितली आहे.
‘द न्यूज’ या इंग्रजी व ‘जंग’ या उर्दू वर्तमानपत्रात जंग समूहाने माफी मागितली असून पाकिस्तानी लष्कर, त्याचे प्रमुख यांच्याबाबत आम्हाला आदर आहे. सीमेवर त्यांनी बलिदान करून देशाचे संरक्षण करण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे.
गंभीर आत्मपरीक्षण, संपादकीय चर्चा, प्रतिसाद व विविध पक्षांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष चर्चेनंतर आम्ही या निष्कर्षांवर आलो आहोत, की १९ एप्रिल रोजी पत्रकार हमीद मीर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याबाबत आमच्या समूहाने केलेले वार्ताकन हे भावनिक व वेदनादायी होते. ते दिशाभूल करणारे, अयोग्य व प्रचारकी थाटाचे होते हे आम्ही कबूल करतो तसेच आयएसआय व त्या संस्थेचे प्रमुख ले. जनरल झहीर उल इस्लाम व त्यांचे कुटुंबीय, पाकिस्तानी लष्कर व दूरचित्रवाणी प्रेक्षक यांची आम्ही माफी मागतो, कारण ते त्या वृत्ताने दुखावले गेले आहेत.
जंग समूहाने असा खुलासा केला आहे, की ते आरोप आमच्या संस्थेने नव्हेतर मीर यांनी केले होते. नंतर त्यांच्या भावानेही त्याची पुनरावृत्ती केली. मीर हे जिओ टीव्हीत काम करतात. त्यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते, की आपल्याला आयएसआय व अतिरेक्यांपासून धोका आहे. मीर यांच्यावरील हल्ल्यानंतर आम्ही हे निदर्शनास आणून देऊ इच्छित होतो, की आयएसआयने वरिष्ठ संपादक तसेच हमीद मीर यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या व त्याबाबत योग्य त्या वेळी सर्व बाबी सिद्ध केल्या जातील असेही म्हटले होते.