अमेरिकेचे विद्यमान परराष्ट्र मंत्री जॉन केरी व माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावर जर्मनीच्या बीएनडी या गुप्तहेर संस्थेने २०१३ मध्ये मध्यपूर्वेत राबवलेल्या एका मोहिमेत हेरगिरी केली होती, तसेच संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे फोनही टिपण्यात आले होते असा गौप्यस्फोट डेर स्पिगेल या जर्मनीच्या नियतकालिकाने केला आहे. मात्र, या दोघांचे फोन चुकून टिपले गेले असा खुलासा जर्मनीच्या सरकारने केला आहे.
   अमेरिकेने एनएसएच्या माध्यमातून जर्मनीसह अनेक देशांमधील नेत्यांची व सामान्य लोकांची दूरध्वनीवरील तसेच इतर माहिती प्रिझ्म कार्यक्रमाच्या माध्यमातून चोरल्याचे प्रकरण एडवर्ड स्नोडेन या एनएसएच्या माजी कर्मचाऱ्याने उघड केले होते. त्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यावरही पाळत ठेवण्यात आली होती, त्या मोबाईलवर काय बोलतात याची माहिती अमेरिकेने घेतली होती, परंतु आता जर्मनीनेही अमेरिकेचे विद्यमान परराष्ट्र मंत्री जॉन केरी व माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावर हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे. अतिरेकी वापरत असलेल्या ध्वनी कंप्रतेवर हिलरी क्लिंटन या  संभाषण करीत असल्याने चुकून त्यांचे संभाषण टिपले गेले असे जर्मनीचे म्हणणे आहे. नियतकालिकाने हेरगिरीची माहिती कुठून मिळाली याचा स्रोत मात्र दिलेला नाही. जर्मन प्रसारमाध्यमांनी याबाबत पर्दाफाश केला आहे.  
क्लिंटन या अमेरिकी सरकारच्या विमानाने प्रवास करीत असताना त्यांच्यावर हेरगिरी केली होती, असा दावा माध्यमांनी केला. क्लिंटन यांच्यावर हेरगिरीचा किंवा त्यांचे संदेश चोरण्याचा हा प्रकार अपघाताने झाल्याचा खुलासा जर्मन सरकारने केला आहे.