मतदानोत्तर कलचाचण्यांत आघाडी

जर्मनीत रविवारी संसदेचे (बुंडेस्टाग) प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान झाले. मतदानोत्तर कल चाचण्यांच्या अंदाजानुसार विद्यमान चॅन्सलर अँगेला मर्केल यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) पक्ष आणि बव्हेरियातील ख्रिश्चन सोशल युनियन (सीएसयू) पक्ष यांच्या युतीला सर्वाधिक म्हणजे ३४ ते ३७ टक्के मते मिळून मर्केल पुन्हा चॅन्सेलर बनतील अशी आशा आहे.

त्या खालोखाल सोशल डेमोक्रॅट्स (एसपीडी) या डाव्या पक्षाला २१ ते २२ टक्के तर मुस्लीम निर्वासितांना विरोध करणाऱ्या आल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाला १० ते १३ टक्के  मते मिळण्याचा अंदाज आहे. एएफडीच्या रूपात कट्टर उजव्या पक्षाला गेल्या कित्येक दशकांनंतर संसदेत या वेळी प्रथमच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मर्केल यांनी स्थैर्य व विकास या मुद्दय़ांवर निवडणूक लढवली आहे. ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर (ब्रेक्झिट) युरोपच्या मुक्त व संयुक्त बाजारपेठेचे भवितव्य, जागतिक मंदीच्या काळात जर्मनीची प्रगती कायम ठेवणे, सीरियामधील निर्वासितांच्या येण्याने निर्माण झालेल्या सामाजिक तणावाला तोंड देणे असे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे बनले होते.

सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच बर्लिनमध्ये रविवारी वार्षिक मॅरेथॉन स्पर्धा असल्याने गर्दीत भर पडली. अनेक रस्ते स्पर्धेमुळे बंद केले होते. राजधानी बर्लिनमध्ये सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या व वातावरण थंड होते. यंदा मतदारांमध्ये निवडणुकीबद्दल फारसा उत्साह जाणवत नव्हता. त्यामुळे देशातील एकूण ६१.५ दशलक्ष मतदारांपैकी किती जण प्रत्यक्ष मतदान करतील याबद्दल साशंकता होती. मर्केल यांनी बर्लिनमध्ये तर सोशल डेमोक्रॅट्स पक्षाचे उमेदवार मार्टिन शुल्झ यांनी जर्मनीच्या पश्चिम भागातील व्युरसेलेन या शहरात मतदान केले. रविवारी सायंकाळी ६ वाजता मतदान थांबले. रात्री ९ वाजल्यानंतर मतदानाचे कल येण्यास प्रारंभ होईल. तर सोमवारी ३ वाजल्यापासून निकाल हाती येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे.